पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कांगावा असतो. काही मूल्ये, जी धार्मिक रूढी, पंरपरा यांवर बेतलेली असतात ती मात्र काळानुरूप बदलणे आवश्यकच असते. एकेकाळी 'जात', 'धर्म' यांचे कठोर पालन हे अपरिवर्तनीय मूल्य होते. त्यानुरूप संस्कार केले जात. आज ते बदलत आहेत. संस्कार हे अगदी बालपणापासून होतात. त्यामुळे ते अगदी हाडीमाशी भिनतात. ते खरवडून काढणे अवघड जाते. मी महाविद्यालयात होते तेव्हाची गोष्ट. वक्तृत्व स्पर्धेसाठी वर्गातील दोन विद्यार्थी व एका सहअध्यापका सोबत आम्ही डबे घेऊन परगावी गेलो. तिथे तीन वर्षांनी आमच्या पुढे असलेला प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रूजू झालेला एक कॉलेजमेट भेटला. त्याने आग्रहाने घरी नेले. पत्नीस शिरापुरीचे जेवण बनवायला लावले. पण वर्गातील मित्राने उपवास असल्याचा बहाणा करून जेवण घेतले नाही. कारण प्राध्यापक मित्र दलित होता. खरे तर बुधवारी सहसा उपवास नसतो.
 मनाला, बुद्धीला पटले तरी प्रत्यक्ष कृती करतांना मन कचरते. संस्कार पाटीवरच्या अक्षरांसारखे पुसता येत नाहीत. परतीच्या प्रवासात स्वतःचा डबा खातांना त्याने कबूली दिली.
 संस्कार देणारे पहिले माध्यम आई. तीच अडाणी, अंधश्रद्ध, वस्तूंचा हव्यासांना विशेष प्राधान्य देणारी असेल तर मुलावर कोणते संस्कार होणार?
 आज भारतातील सुमारे ५२ टक्के स्त्रिया निरक्षर आहेत. ४८ टक्के साक्षरांपैकी ८० टक्के स्त्रियांना सही येते वा थोडेफार लिहिता वाचता येते. दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येत ७० टक्के स्त्रिया आहेत. अजूनही ३२ टक्के लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही. संस्काराची बात मध्यमवर्गीयांतच छेडली जाते. आर्थिक दृष्ट्या निम्नवर्गात दोन वेळची भाकरी शोधण्यात घरदार भोवंडत असते. प्रत्येक घरातल्या मुलांना संस्काराचे लेणे मिळायलाच हवे हे खरे. पण ती जबाबदारी सरकार इतकीच प्रत्येक सुजाण नागरिकांची नाही?
 सत्य-पावित्र्य-सौंदर्य यांबद्दल आस्था, वडीलधाऱ्यांबद्दल आदर, संकटग्रस्तांना मदत करण्याची वृत्ती... सामाजिक न्याय, पारदर्शी आर्थिक व्यवहार, स्त्री पुरूष समभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन, परस्परांचा आदर ठेवून वैचारिक विरोध दृढपणे मांडण्याची स्पष्टता, कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धाडस, व्यक्तिगत स्वार्थापेक्षा देशप्रेम मोठे, एक नाही तर हजारो संस्कार. हे संस्कार देणारी आई, कुटुंब, शिक्षक ही माध्यमे सुजाण, सकस केली पाहिजेत. त्या साठी इतर माध्यमांचा वापर अत्यन्त कुशलतेने, मनस्वीपणे आणि कठोरपणे केला पाहिजे. आज टी. व्ही. वरची शेकडो चॅनेलस् तसेच चित्रपट अत्यन्त विकृत असे संस्कार समाजावर, अल्पवयीन मुलांवर

रुणझुणत्या पाखरा / ६७