पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याचे कार्य शिक्षकाने करायचे असते. त्यातून मुलांवर विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचे संस्कार होतात.
 पूर्वी संस्कार केवळ धर्माशी... धार्मिक आचारांशी निगडित असत. धर्माने सांगितलेल्या मूल्यांशी त्या त्या धर्माचे गट धर्मातील मुलांवर, धर्मगुरूंद्वारे धार्मिक आचार, विचारांचे संस्कार करण्यावरच भर देत. परंतु गेल्या शंभर दिडशे वर्षात धर्माची, त्याद्वारे केल्या जाणाऱ्या संस्काराची चिकित्सा करण्याची परंपरा निर्माण झाली. तशी ती पूर्वी पासूनच आहे. चार्वाकाचे लोकायतिक विचार, जैन-बौद्ध धर्म विचार धर्म चिकित्सेतूनच निर्माण झाले.
 १९४७ साली भारतीय गणराज्याची घोषणा करतांना आपण सर्वधर्मसमभाव, विज्ञान निष्ठा, आर्थिक-सामाजिक-स्त्रीपुरूष समतेचा विचार स्वीकारला. परंतु जी मूल्ये आम्ही घटनेद्वारे अंगिकारली त्यांचे संस्कार करण्याची क्षमता शिक्षक, पालक, माता या महत्वाच्या माध्यमांत निर्माण करण्याची बांधिलकी मात्र स्वीकारली नाही.
 काळाच्या ओघात संपर्काची अनेक माध्यमे निर्माण झाली. वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या माध्यमांचा मुलांवर संस्कार करण्यात लक्षणीय प्रभाव वाढला. किंबहुना आई, कुटुंब आणि शिक्षक या तीनही माध्यमांवर दूरदर्शनसारख्या दृकश्राव्य माध्यमाने कुरघोडी केली. ह्या नवलनयनोत्सवी माध्यमाने भारतीयांना पुरते भारून टाकले आहे. लहानशा खेड्यात जा, शहरातील झोपडपट्टीत जा तिथेही टी.व्ही. च्या ॲन्टेनाची शिंगे घराघरावर खोचलेली दिसतील. घरात धड नहाणी नसेल, संडास तर नसेलच. घरातील स्त्रिया मात्र गाऊन घालून हातात डबा घेऊन झाडाझुडपांचा आडोसा शोधतांना दिसतील.
 शामची आई फारशी शिकलेली नव्हती. परंतु माणूस म्हणून जगतांना पाळावयाची धर्मापलिकडची मूल्ये तिला परंपरेने माहित होती. त्या काळात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीची म्हातारी रस्त्यात पडली. शामच्या आईने शामला तिला आधार देऊन उठविण्यास सांगितले. तिच्या भुकेल्या पोटात दोन घास प्रेमाने घातले. आणि शामला मोळी नीट बांधून देण्यास सांगितले. धर्माच्या धाकामुळे कदाचित् शामला आंघोळही करावी लागली असेल. परंतु माणुसकीचा संस्कार धर्मातील नियमांना बाजूला ठेवून केला गेला. देशप्रेम, अहिंसा, सत्य, दया, क्षमा, शान्ती, नम्रता यांसारखी मूल्ये गैरसोयीची ठरतात. काळानुरूप संस्काराचे रूप बदलतेच अशी भलावण केली जाते. 'राखील तो चाखील' 'सहकारात थोडा स्वाहाकार होणारच' अशा नव्या म्हणीही तोंडावर फेकल्या जातात. पण तो स्वार्थाला वैध रूप देण्याचा

६६ / रुणझुणत्या पाखरा