पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फ्रुटसॅलड पाठवणारेय. आज आपणं गप्पा मारत जेवू. उद्या माझी स्वयंपाक करणारी आशा येईल. त्या सगळ्यांना उद्या इथेच जेवायला बोलावलय. आणि नीरा, रमाकान्तही येतील. नीरा सिडकोतल्या गृहविज्ञान महाविद्यालयात शिकवते. तर चल व्हरांड्यात बसू. मस्त गप्पा मारत. बराच ताण देऊन तो बाबाही... पाऊस चार दिवसांपासून रोज हजेरी लावतोय. जाई आकंठ झुंबरलीय. तिचा मंद मधुर सुवास घेत गप्पा नक्कीच रंगतील."
 शरयू नि नीला पाच सहा वर्षानंतर भेटत होत्या. नीलाने लातूर सारख्या तेव्हाच्या छोट्या गावात मांड मांडलाय. आता मात्र ते वाकडं तिकडं वाढतंय. अर्थात सगळीच शहर वाकडी तिकडी ऑक्टोपस सारखी वाढत असतात. नीला मोहनने ऐसपैस मोठं घर बांधलय. तीनही मुलांना तीन मोठ्या खोल्या. त्या खोल्यात, त्यांच्या मुलांना लागेल म्हणून अजून एक खोली. प्रत्येकीत अत्याधुनिक संडास, न्हाणीघर वगैरे. मुलांच्या खोल्या मजल्यावर. आणि नीला मोहनची खोली, अभ्यासाची खोली, स्वयंपाक घर वगैरे तळमजल्यावर. कसं छान, आदर्श. पण तरीही मनात काय साचलयं...?
 "शरे, आपण दोघींनीही एकत्र कुटुंबाचा आग्रह धरला. मी नि मोहनने त्या दृष्टीकोनातून तीस वर्षापूर्वी घर बांधलं. तिघी सुना शिकलेल्या आहेत. धाकटी बारावी झालेली. सचिनचा प्रेमविवाह. ती चांभार समाजातली आहे. देखणी आहे. सुस्वभावी आहे. मधल्या सौरभची पत्नी अस्मिता संस्कृतची अध्यापक. गावातल्या महाविद्यालयात नोकरी करते. ती दशग्रंथी ब्राह्मण घरातून आमच्या सारख्या मराठीने केला गुजराथी भ्रतार अशा घरात आलीय. माझ्या घरात देव नाही. निसर्ग हाच ईश्वर, मानणारी मी. पण तिने हौशीने देवघर मांडले. त्यात देवी. लंगडा बाळकृष्ण यांच्या मूर्ती ठेवल्या. मी विरोध अर्थातच कशाला करू. ती तिची इच्छा. ती घरातली सदस्या. पण एक मात्र सांगितले. मी अंधश्रद्धा निर्मूलनाची पाईक आहे. तू मला पूजा करण्याचा आग्रह करू नकोस. मोठ्या सुधीरने एमआयडीसीत लोखंडाच्या कॉटस्, कपाटे वगैरेचा छोटा कारखाना टाकलाय. त्याची पत्नी वसू बी. एड. आहे. तीही नोकरी करते. पोळ्यांना दोन्ही वेळेला बाई आहेत. मोठी सकाळचा स्वयंपाक भाजी... वरणभात वगैरे पाहते. धाकटी सकाळचा नाष्टा आणि कोरडया चटण्या वगैरे पाहते. मधली संध्याकाळचे पाहते. पहिली पाच सहा वर्षे गाडी कशी डौलात नि रूळावर चालत होती. मग नातवंडांच आगमन. मोठीला एकच मुलगा. मधलीला दोन मुलगे. धाकटीला दोन्ही मुली. मुलं वाढू लागली. त्यांच्या मनात प्रश्नांची बेटं उगवायला लागली. ... "दादी, दादू गुजराथी आहेत. आपलं आडनाव शहा आहे आणि तुझी आई माझी पंजीमा देशपांडे कशी ग?"

६२ / रुणझुणत्या पाखरा