पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आईला लिव्हरचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिचे श्रद्धास्थान असलेली तिची ज्येष्ठ भगिनीसमान असलेली मैत्रिण, ती व इतर काही मैत्रिणींनी महिलांचे आरोग्य व शिक्षणासाठी एक संस्था काढली होती. त्या संस्थेनेही पंचविशी पार केली होती. तेथे काम करणारा सहाय्यक, हिशेब तपासनीस व मैत्रिण यांनी संगनमताने एका महत्वाच्या निर्णयात्मक बैठकीस आई हजर नसतांना तिची 'सही' कुणाकडून तरी करवून घेतली. शासकीय ऑडीट तपासणीत ते उघडकीस आले. मृत्यूशय्येवर दिवस मोजणाऱ्या कनिष्ठेला 'तू लेखी खोटी साक्ष दे' असे सांगायला ज्येष्ठा आली. पण कनिष्ठा ठाम होती. अवघ्या पाच दिवसानंतर आईने चिरविश्रांती घेतली.
 शेवटच्या क्षणी तिच्या ओठावर सून, कन्या आणि तिला संकटातून बाहेर काढून तिचे जाज्वल्य व्यक्तिमत्व फुलवले अशा मानसकन्यचे नाव होते. आई, संध्याकाळी नातवंडांची दृष्ट काढत असे. 'इडापिडा टळो, आल्यागेल्यांच्या मनात चांगले विचार येवोत आणि सगळ्यांच्या लेकराबाळांचे आयुष्य शतायुषी होवो' ही तिची प्रार्थना असे.

'ती आई होती म्हणूनी
घन व्याकूळ मीही रडलो...'

 या कवी ग्रेसच्या शब्दातली 'व्याकुळता', घन शब्दातले 'चिरंतन भारलेपण' आणि नसण्याच्या वेदनेची लय मला आजही अस्वस्थ करते.
 आई अवघ्या अवकाशाला व्यापून उरत असते. ती शब्दात न मावणारी असते. कशी असते ती?

शिकेकाईचा सुगंध
भरून राहिलाय आसमंतात
तिने केव्हाच मोकळा
सोडलाय गैरसमजांचा आंबाडा
फिरतोय तिच्या मुक्त केसांतून
समजुतदार वारा
आणि त्याला सापडलेत
आईचे हरवलेले डोळे
तिच्याच पापणीत
(दासू वैद्य)


रुणझुणत्या पाखरा / ५७