पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेणसडा घालून त्यावर रांगोळी रेखणं, गवरण्यांचा देखणा मांड मांडण हे जमणार तिलाच. भलेही तिने कलेचा... सौंदर्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला नसेल. वयाच्या सुरकुत्यांना निसर्गाची देणगी म्हणून स्विकारत, मनातली उत्सुकता सुकू न देता कंम्प्युटरवर काम करणाऱ्या मुलाशेजारी बसून जिज्ञासेने प्रश्न विचारणारीही आईच. आई म्हणजे साक्षात् उर्जेचा चिरंतन झरा.

दासू वैद्य यांचे शब्द. त्यांचे असले तरी प्रत्येकाच्या तनामनातले.
प्रत्येक आईचा मुलगा
कवी असूच शकत नाही
पण प्रत्येक मुलाची आई
त्यांच्यासाठी एक कविता असते
न विसरणारी...

 प्रत्येक स्त्री जेव्हा 'आई' होते किंवा निर्मितीच्या प्रलयंकारी वेदना जवळून अनुभवते तेव्हा 'आई' झाल्यावर तिलाही आईवर कविता लिहाविशी वाटतेच. भलेही ती कवी नसेल. अशीच एक कविता अनामिकेची

...अंधाराला हिरमसून पाने मिटून घ्यावीशी वाटतात
तेव्हा ...?
क्षणात
काही क्षण असे येतात
पूर्वी इतकेच सजून धजून
विझू विझू पहाणाऱ्या
आठवणींना
नवी पावले
जोडून.
आई तुझ्या आठवणींना
लगटून...

 'आई' ही पुस्तिका चाळतांना मलाही माझी आई आठवली. कणखर मनाची, आतल्या आत अश्रूंना बांध घालणारी. १९५५ चा प्रसंग. माझे पपा... शंकररावांनी गोवामुक्ती संग्रामात जाण्याचे ठरवले होते. त्यांना निरोप देण्यासाठी धुळ्याच्या स्टेशनवर गर्दी लोटली होती. माझ्या डोळ्यांचा बांध फुटला होता. मी असेन १४/१५ ची. "शैला, तुझे एकटीचेच पपा सत्याग्रहात चालले नाहीत. अनेकांचे आईवडिल सामिल झाले आहेत. अभिमानाने हसत निरोप दे". आईने कडक शब्दात मऊपणे डोक्यावरून हात फिरवत बजावले.

५६ / रुणझुणत्या पाखरा