पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आईचा 'अवकाश... स्पॅन इतका विशाल असतो की शब्दांचे घुमारे नेहमीच नव्या उन्मेषाने मोहरत जातात. तरी परिपूर्ती होत नाही. अधुरेपणा सलत रहातो. त्या दोघींना जाणवले की आई विषयी विविध क्षेत्रातील नामवंतांना बोलते करायचे. त्यातून 'आई' या पुस्तिकेची निर्मिती. जणू या आजच्या आयांनी त्यांच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या आईला वाहिलेली ती स्मरणांजली.
 इवल्या डोळ्यांना अवघा निसर्ग, गंध...रंग... स्पर्श यांतून उलगडून दाखवणारी आई. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देणारी, निर्भय रहा असे स्पर्शातून सांगत धाडस देणारी आई वात्सल्याचा निरंतर झरा, संकटांना झेलतांना 'आधारवड' होऊन पाठीशी राहणारी, बुद्धी एवढेच गुणार्जनाला महत्व देणारी, दारिद्रय... विषम परिस्थिती या सर्वांशी हसत जुळवून घेणारी महामना आईच!
 तिचा स्पर्श विलक्षण गारवा आणि ताजवा देणार. म्हणूनच कांदिवलीच्या अनघा धाडी म्हणतात,

...पहिल्या पावसात भिजतांना, माय तुझी आठवण येते किंवा.
जेव्हा आला पाऊस पहिला
भिजतांना जाणवली तुझ्या हातांची ऊब.

 ती साक्षर नसली तर निरक्षर कसे म्हणावे तिला? कारण त्याही पलिकडचे शहाणपण... सुजाणत्व तिच्यात असतेच. चैत्रगौरीचं भिंतीवरचं 'लिवणं', अंगणात

रुणझुणत्या पाखरा / ५५