पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लघुनिबंधात विचार डोकावणे त्याच्या प्रकृतीला कसे बाधक आहे वगैरे बाळकळ मुद्दे मांडले जातात. उदा. 'एखाद्याने सहजच भेटीसाठी आलो अशी सुरुवात करून इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्या व सहज ओघात 'यंदा कर्तव्य आहे काय' असे विचारावे म्हणजे जसे वाटते, तसा प्रत्यय फडके- खांडेकरांचा निबंध वाचताना मला पुनः पुनः येतो. एका क्षणात भेटीसाठी येण्याचा हेतू कळला म्हणजे गप्पांतील स्वाभाविकपणा हा अभिनय हा लघुनिबंधात जाणवतो. शेवटी मतेच मांडायची म्हटल्यावर सगळा खेळकरपणा, सगळे चिंतनाचे प्रयोग, अभिनय ठरतात. विचार सजवून मांडण्याचा प्रयत्न करणारी धडपड ठरतात.
 एका प्रख्यात समीक्षकाचे हे विचार वाचून असे वाटते की जण 'विचार' या घटकाची ललितगद्याला ॲलर्जीच आहे की काय! 'विचार' प्रविष्ट झाला की ललित निबंध संपला!
 बाकीच्या वाङ्मयप्रकारामध्ये कितीही मोठी परिवर्तने झाली तरी याचे नाव बदलले नाही. हरिनारायण आपटे यांची ही कादंबरी आणि भालचंद्र नेमाडे यांची सुद्धा कादंबरीच; ना. सी. फडके यांची लघुकथा आणि जी. ए. कुळकर्णी यांची देखील लघुकथाच. गोविंद बल्लाळ देवल यांचे ते नाटक आणि महेश एलकुंचवार यांचे ते नाटकच! असे असताना मराठी लघुनिबंधाच्या बाबतीतच असे का व्हावे? त्याचे नाव टाकून देऊन त्याला ललितगद्य हे नवे नाव द्यावे लागावे?
 प्राचीन साहित्यात सगळे वाङ्मयप्रकार पद्यमय राहण्याच्या धडपडीत होते. मुद्रणकलेचा जेव्हा शोध लागलेला नव्हता तेव्हा लेखन जपण्याचा सगळा भार स्मरणशक्तीवर पडायचा तेव्हा गद्यरचना क्वचितच केली जायची. स्मरणसुलभता हे पद्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत न येणाऱ्या कित्येकांना गीतेचा पंधरावा अध्याय, रामरक्षा पाठ असते याचे कारण हे ग्रंथ पद्यात आहेत. वेदांचे जतन त्यांच्या या स्मरणसुलभतेमुळेच करणे शक्य झाले.
 प्राचीन साहित्यातला दासबोध हा वैचारिक गद्याचा ग्रंथ आहे (कविता नव्हे) तर ज्ञानेश्वरी हे ललित गद्य आहे (कविता नव्हे) असा विचार कधी कुणी का केला नाही याचे नवल वाटते. दासबोधात गद्याचे पौरुष फक्त आहे, करुणाष्टकात कवितेचे स्त्रीत्व फक्त आहे. पण ज्ञानेश्वरीत कवितेच्या ललित्याशी वैचारिकतेचा सुंदर संयोग झाला आहे. ज्ञानेश्वरी हा थेट माधव आचवट, दुर्गा भागवत इरावती कर्वे, गो. वि. करंदीकर, विजय तेंडुलकरांच्या प्रखर वैचारिकतेशी नाते सांगणारा प्राचीन काळातला सुंदरतम ललितगद्याचा ग्रंथ आहे.

सहा / रुणझुणत्या पाखरा