पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आले पाहिजे. परंतु हाही एक व्यवसाय आहे. त्यांत आरोग्य सांभाळून पारंगतता मिळवायला काय हरकत आहे? तो व्यवसाय का निवडू नये?" अशी भूमिका विशाल मानवतेच्या दृष्टीतून योग्य होईल? एका परिषदेत एका कार्यकर्तीने अशी भूमिका मांडली. खेड्यातील महिला तिथे होत्या. त्यातील एकीने प्रश्न विचारला, "ताई, तुमची लेक ह्यो वेवसाय मला करायचा असं म्हनली तर तुमी काय सांगाल तिला?"
 डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी बहिष्कृत भारतात नोंदवले आहे की, 'जेथे स्त्रीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:चे शरीर... शील विकावे लागते, तिथे लोकशाही निर्माणच होऊ शकत नाही.
 दुसऱ्या सत्राचे नांव होते 'पाण-वेळ' नर्मदा विस्थापितांचे दुःख बुडीबेन आणि लताने मांडले. मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यात राहणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न आणि फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांच्या भयानक जिण्याचे वास्तव चित्र मांडले कौसल्या आणि नसरीनने. तसेच चन्द्रा आणि रूथ मनोरमा या कर्नाटकातल्या झुंजार महिला कार्यकर्तीने, परदेशी नोकरीच्या लोभाने स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांचे प्रश्न मांडले. जकार्ताच्या सुप्रहातीन आणि ताती कृष्णवती यांनी सांगितले की, स्थलांतराचा लोभ दाखवून तरूण मुलींना, स्त्रियांना फसवणाऱ्या अनेक एजन्सीज आशियाई देशात वाढत आहेत. आपल्या घराला पैसा पुरविण्यासाठी देहाचे हाल सोसणारी स्त्री स्वत:च्या शब्दात दुःख सांगू लागते तेव्हा क्षणभर काळाचा प्रवाहसुद्धा गोठून जातो. ती मैत्रिण सांगत होती. ज्या काम करणाऱ्या स्त्रिया निर्घृण प्रकारांना विरोध करतात. अशांची नांवे काळ्या यादीत जमा होतात. काम करणाऱ्या स्त्रियांची काळीयादी हाँगकाँगमध्ये तयार होते पण वाईट वागवणाऱ्या, लैंगिक शोषण करणाऱ्या, कामासाठी मारहाण करणाऱ्या मालकांची काळीयादी का केली जात नाही?
 अलिकडे सर्वच देशांत विविध प्रकारच्या अणुसाधनांचा, शस्त्रांचा वापर होतो. त्यासाठी सतत प्रयोग सुरू असतात. अतिरिक्त रसायनांचा वापर सुरू आहे. या साऱ्यामुळे 'बंजरभूमी'चे वेगवेगळे प्रकार वाढू लागले आहेत. केरळमध्ये दक्षिण भागात युरेनियम खूप सापडते. १९५७ साली 'युनो'ने या भागात लोकवस्ती करू नये असे बजावले होते. पण... वाढती लोकसंख्या वगैरे. या सर्वांचा परिणाम तेथील लोकांच्या जननशक्तीवर झाला आहे. चल्लम्माला ९ मुले झाली पण एकही सर्वसामान्य (नॉर्मल) नव्हते. आज एकही जिवंत नाही. अमेरिकेने केलेल्या संशोधनातून लक्षात येत आहे की याचा वाईट परिणाम पुरूषांच्या स्पर्मवर... वीर्यावर झाला आहे.

५२ / रुणझुणत्या पाखरा