पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अजूनही कधीतरी असे घडू शकते. समाजाला नको असलेल्या अडचणीच्या वाटणाऱ्या स्त्रियांना 'चेटकीण' ठरविले जाते. प्रश्न विचारणाऱ्या वा प्रश्न निर्माण करणाऱ्या स्त्रिया समाजाला कुठे परवडतात? हल्यानी ही महिला चेटकीण नव्हती. नवऱ्याचाही तिच्यावर विश्वास होता. पण शेजाऱ्यांपासून ते गावातल्या ओझापर्यंत सर्वांनी तिला चेटकीण ठरवले. महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे ती वाचली.
 बेकारीचे संकट स्त्रियांवर अधिक. मग नोकरीकरता पर्यटन व्यवसायात शिरकाव झाला पण तिथे वेगळेच वाढून ठेवलेले होते आणि आहे. आशियायी देशातील थोडेफार शिकलेल्या मुलींना 'मदतनीस' म्हणून अरबदेशात पाठवले जाते. भरपूर पगार आणि परदेशगमनाचे आकर्षण. मुली या जाळ्यांत सहजपणे अडकतात. तिथे गेल्यावर एकाकी होतात. ना भाषा येत ना जनसंपर्क, त्यामुळे लैंगिक शोषण होते. विकसनशील आशियायी देशातील वाढते दारिद्रय, वाढती लोकसंख्या, कुटुंबात व समाजात स्त्रियांना नसलेली किंमत, यांचा फायदा उठवला जातो. दहा बारा वर्षांच्या कोवळ्या कळ्या लैंगिक व्यवसायात गुंतवून अकाली खुरडल्या जातात. या प्रश्नावर अनेक संघटना आशियायी देशांत काम करीत आहेत. नेपाळच्या संध्या श्रेष्ठ व मीना या दोघींनी हे प्रश्न मांडले.
 देवदासींच्या व्यथा मीना सेशूने दुर्गाच्या रूपाने मांडल्या. सांगली परिसरात मीना, उज्ज्वला या स्त्रियांच्या प्रश्नांवर अत्यंत धडाडीने काम करतात.
 "ताई, तुमच्यापाशी बुद्धी आहे. डोकं आहे ते इकून तुमी चार पैशे कमावता. आमाला शिक्षन मिळालं न्हाई. हयेच शिक्षन मिळालं. माज्यापाशी... सुंदर...डौलदार शरीर हाये. पुरुषांना आवडतं तसं वागण्याची कला आहे. ते इकून मी चार पैशे कमावते. मग तुमच्या माझ्यात फरक का?" दुर्गाने समोर टाकलेला प्रश्न. सर्वांना अस्वस्थ करणारा अंगावरचे संस्कृती... रित... शक्ती वगैरेचे रेशमी, बांधीव कपडे झरकन फेडणारा प्रश्न. अगीनवेळ असे कपडे सोलणारी आणि ऐकणाऱ्यालाही होरपळवणारी. माझ्या मनात मात्र प्रश्नांचे शोभादर्शक गरगरत होते.
 शरीर विकण्यातून शरीराच्या आरोग्यावर, नैसर्गिक सुदृढतेवर होणाऱ्या परिणामांचे काय? दुर्गाला श्रम करून चार पैसे सन्मानाने मिळाले असते. तर तिने हा 'व्यवसाय' स्वीकारला असता का? की शॉर्टकट मनीला महत्त्व? इंग्रजी कवितेतील गवळण म्हणायची की, 'माय फेस इज माय फॉरच्यून ... माझं भाग्य म्हणजे माझा चेहरा. तो सुंदर तर माझं नशीब सुंदर!" हे खरंच का? या व्यवसायातील स्त्रियांत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्यांना समाजात मोकळेपणाने जगता

रुणझुणत्या पाखरा / ५१