पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इंजिनिअर पण आफ्रिकन नॅशनल कॉन्फरन्सच्या महिला विभागाच्या संघटक थेंबोसिली माजीला, आणि इंडोनेशियातील न्यू साऊथ वॅर्लस विद्यापीठात काम करणाऱ्या डॉ. ऐलिन पिहावे आणि अरबस्तानातील स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या, ट्यूनिस विद्यापीठातील खादिजा शेरिफ याही ज्यूरी म्हणून रंगमंचावर होत्या.
 लोकसाक्षीचा कार्यक्रम ५ सत्रांतून झाला. स्त्री ही निसर्गाचे रूप आहे. निर्मितीसाठी लागणारा काळ... वेदना... भावबंध यांचा प्रत्यक्ष अनुभव ती घेत असते. म्हणूनच स्त्री आई असते. अग्नीत जणू ती उभी. म्हणून ती अग्निघटिका. ते पचवून ती सर्वांना फुलवणारी चैतन्यमयी 'आई' होते. आपण नदीला लोकमाता म्हणतो म्हणून ती जलघटिका... पाण वेळ माती, दशदिशा यांतील सुगंध जगभर पसरवणारी लोकमातात नदी असते. जगभर सुगंध पसरवणारी वाऱ्याची लहर असते. सुख... दुःख, चांगले वाईट, जे जे कवेत येईल ते ते उरात सामावून घेणारी, सारे भलेबुरे हिरव्या अंकुरातून जन्माला घालणारी 'भूमाता' असते. दहा दिशातून येणाऱ्या अनुभवांना पचवून ठामपणे उभी राहणारी साक्षात् 'ज्ञानदा' असते. तिच्या या पंचरूपाचे प्रतीक जणू ही पाच सत्रे होती. प्रत्येक सत्रापूर्वी २ ते ४ मिनिटांच्या संगीतबद्ध चित्रफितींच्या दृश्यसाक्षी झाल्या. भोपाळ गॅसपीडित, पुरांत वाहणारी गांवे, दुष्काळाने दुभंगलेली घरे... निसर्गाचे सौंदर्य, त्याचा सुखद आस्वाद घेणाऱ्या जमाती... अशा हजारो संदर्भ देणाऱ्या चलचित्रांचे ते 'कॉकटेल', पाहणाऱ्याला अस्वस्थ करणारे होते.
 पहिल्या सत्राचे नाव होते अग्निघटिका. त्यांत हुंडाबळी, परित्यक्ता बुद्धिमान स्त्रिया, चेटकिणी ठरवून मारण्याची प्रथा, देवदासी प्रथा, मुली जन्मत:च मारण्याची प्रथा आणि पर्यटन व्यवसायातून वाढलेला वेशाव्यवसाय या प्रश्नांवर, त्या प्रश्नांना प्रत्यक्ष तोंड देणाऱ्या... त्या आगीत होरपळणाऱ्या, महिलांनी साक्षी दिल्या.
 तामिळनाडूच्या उसलामपट्टी जिल्ह्यात आजही, मुलगी जन्मताच तिला मारून टाकण्याची रित आहे. या भागातील काही जमातीतील आयांना फक्त एकच मुलगी जिवंत ठेवता येते. तिने विरोध केला तर नवरा बायकोला टाकून देतो. मुलगा व्हावा म्हणून नाजूक अंगाला सुई टोचण्याचा विधी बायकांना करवून घ्यावा लागतो. या भयानक परंपरेला इंडियाटुडेने १९८६ साली वाचा फोडली. परंतु कल्लार समाजातील ही विषारी प्रथा केवळ शासकीय प्रयत्नांनी कशी जाईल. त्यासाठी शासनाने गेल्या १३ वर्षांत काही केलेय का? काय केले? आणि परिणाम?
 स्त्रियांना चेटकी ठरवून मारण्याची प्रथा युरोपातही होती. या प्रथेचा धागा 'स्त्री' च्या बुद्धिमत्तेशी जोडलेला आहे. झारखंडात अशा अनेक स्त्रिया मारल्या गेल्या.

५० / रुणझुणत्या पाखरा