पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवन जगणारी अनेक तरुण मंडळी होती. त्यात कोणताही अभिनिवेष नव्हता किंवा 'दलित सेवक' अशी शासकीय 'डिग्री' ... पदवी मिळवण्याचा अट्टहास नव्हता.
 डॉ. बाबासाहेब एका जातीचे नव्हे तर सर्वांचेच आधारस्तंभ होते. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष, ... सर्वधर्म, सर्वजाती, सर्व वर्ग समभाव हा घटनेचा 'प्राणबिंदू' ठेवणारे महात्मा. पाश्चात्य देशातील स्त्रियांना समतेच्या निकषावर मतदानाचा अधिकार मागण्यासाठी चळवळ करावी लागली. बाबांनी तो अधिकार आम्हाला स्त्रियांना घटनेद्वारा दिला. हिंदू कोड बिलात योग्य ते बदल होत नाहीत हे पाहून घटना समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 धर्म मग कोणताही असो त्याच्या चौकटी दुधारी... न तोडता येण्यासारख्या कठोर बनवण्याचे काम धर्मातले धुरिणच करतात. मुळात सर्व सामान्य माणसांना संघटितपणे सुखकर, एकमेकांसह जगता यावे म्हणून 'धर्म' निर्माण झाले. सर्वांना सोयीस्कर असे नियम केले गेले. मूलत: धर्म माणसाने माणसांच्या सोयीसाठी निर्माण केला. माणुसकी, परस्पर प्रेम त्याचा पाया होता.
 हिंदू धर्मात चातुर्वर्ण्य आला त्या आधारे शेकडो जातींचे जाळे निर्माण झाले. कठोरता आली.
 "संगच्छंध्वं, संवदध्वं, संवो मनासि जानताम्..." एकमेकांची मने जाणून घेऊ आणि सामूहिकपणे उजेडाच्या... सुखसमृद्धीच्या दिशेने सुसह्य जीवन जगू अशी प्रार्थना वेदात होती. वेद अपौरूषेय म्हणजे ईश्वर निर्मित नाहीत असे सांख्य, वैशेषिक मानीत. आद्य शंकरार्चांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून सामान्य माणसाला काचणारे नियम काढून नवीन रचना केली. 'ब्रहम सत्य जगन् मिथ्या' अशी मांडणी केली ती गौतम बुद्धाच्या 'जगत् शून्यं' च्या जवळ जाणारी आहे. ती करतांना त्यांनी तत्कालीन सर्वच धर्मांचा अभ्यास केला. नव्या रचनेवर बौद्धाच्या 'धम्माचा' प्रभाव होता. म्हणूनच त्यांना 'प्रच्छन्न बौद्ध' असे म्हणत.

रुणझुणत्या पाखरा / ४५