पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 "खारोड्या, पापड्या कांही आहे का घरात? या तापलेल्या दुपारी भाजलेले शेंगदाणे, गूळ नि खारोड्या हव्याच!" मराठवाडा नाहीतर खानदेश वा कोल्हापूरचे मुंबईत स्थायिक झालेले पुरूष पावसाने जोरदार हजेरी दिली की हा प्रश्न विचारणारच!
 ग्रामीण भागातून शहरात गेलेल्या कुटुंबातील पुरूषांना हा खास मेवा हवाच असतो. भलेही मग ते मुंबई पुण्यात स्थायिक झालेले असोत. राजस्थानी घरातून जेवणाच्या शेवटी पापड हवाच. त्याशिवाय जेवण झालंय, पोट भरलंय असं वाटतच नाही. तर कोकणात ज्यांच्या पूर्वजांची नाळ पुरली होती ते देशावर येऊन राहिल्याला शंभरवर्षे झाली तरी जेवणाच्या शेवटी सुपारी एवढा का होईना दही, दूधभात खाल्ल्याशिवाय मन तृप्त होत नाही.
 फेब्रुवारीच्या मध्यातच ऊन चढू लागते. उन्हाळ्याची चाहूल लागते. लहानपणी पपांचे पक्षकार मोराण्याचे जिभाऊ, भलामोठा कोहळा घरात आणून देत. नि सांगत 'बाई, आबईनं कोहळा दिलाय' पापडासाठी. कोहळ्याच्या पाण्यात केलेले पापाड निके म्हणजे पवित्र असतात. वैधव्य आलेल्या, पूर्वी लाल लुगड्यात असणाऱ्या बायांनी लाटले तरी सोवळ्यातल्या स्वयंपाकासाठी ते चालंत. मरेस्तो कष्टाशिवाय त्यांच्या जगण्यात होते काय? ज्या शेतकऱ्याच्या शेतात कोहळ्याचा वेल असे तो आवर्जुन कोहळा ओळखीच्या घरांतून देई. कोहळा विकत नसत. आमच्या घरात

४६ / रुणझुणत्या पाखरा