पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आत्मा, परमात्म्याशी एकरुप होणे वगैरे. ते रंगून सांगत. काही नास्तिकांनी मात्र परमेश्वरच नाकारला असे सांगत त्यांनी चार्वाकाचा श्लोक तेव्हा सांगितला होता.

यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणंकृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कृतः।।

 जीव आहे तोवर मौज मजा करा. भस्म झालेला देह पुन्हा येत नसतो. म्हणून खा ..प्या. रिण काढून सण साजरा करा. हा श्लोक सांगतांना चार्वाक् कसा अनीतीमान होता. नास्तिक होता हे भरभरून सांगत.
 चार्वाकाच्या तत्वज्ञानाचे नेमकेपण लोकसाहित्याचा शोध घेतांना हाती आले. चार्वाक दर्शनाला 'लोकायत' म्हणतात. 'लोक' म्हणजे इहलोक. पंचेन्द्रियांनी जे प्रत्यक्ष अनुभवतो ते सत्य. 'आयात' म्हणजे आधारित. इहलोकावर आधारलेली, सर्व सामान्यांना मान्य असणारी विचारधारा. एक इहवादी, जीवनवादी तत्वज्ञान. मानवाला स्वत:च्या माणूसपणाची, निसर्गाने त्याला दिलेल्या दोन शक्तींची, ... कार्यकारण भावाचा शोध घेण्याची (विचार करण्याची), तो वाचे द्वारे व्यक्त करण्याची... जाणीव झाली आणि तो स्वत:ला 'मी कोण? मला कोणी निर्माण केले? मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय?' असे प्रश्न विचारू लागला. त्यातून तत्वज्ञानाच्या अनेक विचार धारा निर्माण झाल्या. त्यालाच आपण 'दर्शने' असे म्हणतो. एकूण नऊ दर्शने आहेत. सहा आस्तिक दर्शने आहेत. तर तीन नास्तिक दर्शने आहेत. ईश्वराचे अस्तित्व, परलोक, पापपुण्य, वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिक.
 हा नास्तिक शब्दही लहानपणीच भेटला. नास्तिक म्हणजे दुराचारी, परमेश्वर न मानणारा, वागण्यात ताळतंत्र नसलेला, नीतीहीन, जेजे चांगले ते नाकारणारा समाजद्रोही माणूस ...व्यक्ती. हा अर्थ मनात स्थिर झाला.
 माझी आजी म्हणायची. "बेबीचा नवरा पक्का नास्तिक आहे. घरात देव नाहीत. पण वागायला किती चांगला. बेबीला फुलासारखा सांभाळतो. नाहीतर प्रेमाचा. विंजिनेर आहे. पण किती धाक. मोटार चालवायला शिकलीच पाहिजे म्हणून धाक आणि कोणाकडे हळदीकुंकवाला जायचं तरी धाक. जळला मेला तो धाक ...पण बेबीच्या नवऱ्यानं मला आंब्याच्या योगेश्वरीचं दर्शन मोटारीतून नेऊन घडिवलं. पण जावईबापू मंदिरात मात्र आले नाहीत हो." आणि 'नास्तिक' हा शब्द फारसा वाईट नसतो असा बारिकसा बिंदूही मेंदूत नोंदला गेला.
 लोकसाहित्याच्या शोधात देवीप्रसाद चटोपाध्याय यांचे 'लोकायत', स. रा. गाडगिळांचे मराठी भाषेतून सुलभपणे अंतरंगात पोचलेले 'लोकायत' हे महत्वाचे थांबे,

रुणझुणत्या पाखरा / ३९