पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 चार्वाकाचे नाव नववीत असतांना जोशी सरांकडून ऐकले. ते आम्हाला संस्कृत शिकवीत. रोज एक नवा श्लोक म्हणवून घेत आणि त्यावर त्यांची मल्लीनाथी. संस्कृत श्लोक घटवून घेतल्यामुळे वर्गातील सर्व मुलींची वाणी मात्र शुद्ध झाली.
 'ज्ञान प्राप्त करून घेणे हा सर्वांचा हक्क आहे. मात्र तो अधिकार कष्ट साध्य असतो. केवळ ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन तो मिळत नाही. फार तर पूजाअर्चा सांगता येते. ती सांगणे म्हणजे ज्ञान नाही. ती एक दुय्यम दर्जाची कारागिरी आहे.' असे ते म्हणत आणि 'बेकंबे'चा पाढा पूजा सांगण्याच्या अविर्भावात आणि स्वरात म्हणून दाखवित. अख्खा वर्ग पोट धरून हसे.
 'हं आता दक्षणा द्या' असे म्हणत मोठ्यांदा खोऽ खोऽ हसत. नंतर डोक्यावरची काळी टोपी काढून धोतराच्या सोग्याने शेंडी राखलेल्या टकलावरचा घाम पुशित. तो एक मोहक संस्कार होता हे आज जाणवते.
 ज्ञान म्हणजे परमेश्वराचा घेतलेला शोध, जीवाशिवाचा सिद्धान्त. तो त्यांचा लाडका. रिकाम्या मडक्यातही हवा असते आणि बाहेर सर्वत्र हवा असते. मडके फुटले की त्यातील हवा बाहेरच्या हवेत मिसळून जाते. तसेच शरीर मृत होणे म्हणजे जीव ...

३८ / रुणझुणत्या पाखरा