पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हवा. ताई लक्ष्म्यांचा सण बामण, माळी, कोष्टी.. समदे अगदी आमी मांग... चांभार सुद्धा साजरा करतो. मालकीणीने सारखा तगादा लावलाय. ताईला नौकरी हाये. त्या नक्की देतील पैशे.. तुमी हे असलं काईपन करीत न्हाई पण आमाला लक्ष्मीला सजिवलं न्हाईतर अपसकुन वाटतो. मन धास्तावतं."
 ...ते शब्द मनात कायमचे रूजले. भारतीय सण, उत्सव, विधी आणि त्यांतील स्त्री प्रधानता यांचा शोध घेतांना फारपूर्वी मनात उगवलेल्या ओळी पुन्हा उलगडू लागल्या. कोकणात भाद्रपद शुद्ध षष्ठीला गौरींना आवाहन केले जाते. तर देशांवर लक्ष्म्या घरी येतात. कोकणात गौरी नदीतल्या खड्यांच्या असतात. काहींच्यात तेरड्याच्या झाडांच्या. देशावरच्या लक्ष्म्या मात्र अनेक घरी मुखवट्यांच्या.. तांब्याच्या लोट्याच्या वगैरे असतात पण लक्ष्म्या घरी येतातच. आणि तो 'कुळाचार' म्हणून श्रद्धेने साजरा होतो. बाहेरगावी असलेले मुलगे, सुना घरी येतात.
 भारतीय जीवन परंपरेने स्त्रीला सुपीकतेचे प्रतीक मानले आहे. जमीन आणि स्त्रीमधील जनन क्षमता मानवाला गूढ वाटली. स्त्रिया या क्षमतेमुळे समाजात सन्माननीय आणि स्थिर झाल्या. अन्नाचा शोध, कंदमुळे शोधणे, पालेभाजी शिजवणे... याचा त्यांनीच शोध लावला. आणि ती सुपीकतेचे प्रतीक बनली. या काळात घरातल्या लक्ष्म्या, सुना माहेरी जात नाहीत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात विधीपूर्वक हा सण आचरतात. मराठी माणूस. परप्रान्तात असला तरी धान्याच्या राशी मांडून पूजा केली जातेच. या संदर्भात स्टारबक हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो हा सन्मान स्त्रीला शेतीप्रधान अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतून मिळाला आहे. बैलांचा नांगर वापरात येईपर्यन्त स्त्री समाजाच्या केन्द्रस्थानी होते. मुदगलानी ही स्वत: नांगर चालवणारी, शेती करणारी स्त्री होती. अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा हिने आपल्या बुद्धिवान परंतु आळशी पतीच्या हातात फावडे देऊन शेतीकामाला स्वत:बरोबर घेतले.
 लक्ष्म्या हा सण शेतीच्या समृद्धीसाठी असतो. सप्तमीला त्या बसवतात अष्टमीला जेवतात. नवमीला परततात. या उत्सवावर स्त्रियांनी रचलेल्या शेकडो ओव्या परंपरेने गायल्या जातात.

लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
धन्याच्या घरी लक्ष्मी आली.

 सोन्याची पावले ज्येष्ठेची की कनिष्ठेची? ज्येष्ठा कोण? अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले तेव्हा लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी, साक्षात् दारिद्रय... अशुभ...

३२ / रुणझुणत्या पाखरा