पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अंगणात माझ्या
भदव्याचा मोर
आभाळी विहरे
सावळा चकोर..

 घनघोर काळ्याभोर ढगाची गर्दी दक्षिणेकडून घोंगावत येई. आणि अचानक त्यांनी वाट पाहणाऱ्या माझ्या तनामनातून या ओळी उमटल्या. त्यालाही आता ४०/४२ वर्षे उलटून गेली आहेत. तरी ते अंगणं, हिरवे..निळे..सोनसळी पंख पसरून, नाचणारा मोर, सावळ्या मेघांनी गर्द झाकलेले आभाळ अगदी तस्सेच ताजे टवटवित आहे.
 खानदेश उन्हात भाजणारा असला तरी अर्धा भाग सातपुड्याच्या डोंगरमाळा आणि तापी... तप्ती सारखी प्रसन्नपणे धावणारी नदी यांमुळे दुष्काळाचा फेरा सतत घिरट्या मारीत नसे. पण मराठवाड्यात, त्यातूनही बीड जिल्ह्यात आल्यावर जाणवले की दुष्काळ जणू बाहेरच्या ओसरीच्या कोपऱ्यात कायम टेकलेला असतो. त्यामुळे श्रावणभादव्याचे अप्रूप मनात अधिकच रूजले.
 १९७० चा काळ. पोळा आला तरी पेरण्या नव्हत्या. पण गणराया नाचत आले नि त्यांच्या तालावर पोरंसोरंही नाचली. एक दिवस खरात भाऊ सकाळीच आले. चहा घेतांना काहीशा घुटमळत्या आवाजात खाली मान घालून म्हणाले. "ताई जरा पन्नास रुपये मिळतील. लक्ष्म्या उद्याच घरला येतील त्यांच्यापुरता तरी साजाबाजा करायला

रुणझुणत्या पाखरा / ३१