पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनिष्टदायिनी बाहेर आली. नंतर लक्ष्मी. तिच्यावर नारायणराव भाळले. पण मोठीच्या आधी धाकटीचा विवाह कसा होणार? मग अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनींशी लावला. तर तिथे आश्रमातले सात्विक वातावरण तिला सोसेना. तिने तिच्या अनिष्ट आवडी निवडी सांगितल्या. मुनी अस्वस्थ झाले. तिला एका अश्वत्थ वृक्षाखाली बसवून ते परतले. ज्येष्ठा अलक्ष्मी पतीची वाटच पहात राहिली. शेवटी आक्रोश करू लागली. तो ऐकून लक्ष्मीनारायण तिथे आले. त्यांनी तिला सांगितले तू इथेच स्थिर हो. दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल. हा वृक्ष पूज्य मानला जाईल. दूर्जनं प्रथमं वन्दे' ही मानवी प्रवृत्ती आहे. दैवत शास्त्रांचे मान्यवर अभ्यासक रा. चिं. ढेरे लिहितात, श्री सूक्तानुसार लक्ष्मी हस्तिनाद प्रबोधिनी, गजलक्ष्मीच्या रूपात आहे. गज हे पुरूषत्वाचे प्रतीक. पाऊस पाडणाऱ्या आभाळाचे प्रतीक, या काळात ज्येष्ठ आषाढात पेरलेली पिके भरात येतात. कणसात येतात. सृष्टीच्या सुफळसंपूर्णतेचे हे दिवस. गौरी बोळवतांना कोकणातली स्त्री विचारते.
आज गौरी जाशील ती कधी गौरी येशील?
पाऊस पडे, गंगा भरे येईन मी भादव्यात
पडवळीच्या फुलांवरनं येईन मी तळपत
पाच पडवळं काढा माझ्या हौशा करवी...

 देशावरची स्त्री म्हणते,
सरिला सरावन भादवा आनंदाचा
आशा पाठमोरी मुऱ्हाळी सुखाचा
पाऊस पडला चिकूल झाला
वहात आली गंगा...
पेरिला मका, धान्य लाल तुरी
पावनीला वाढा भाजी ठेचा आणि भाकरी...

 या पाहुणीला आल्या दिवशी रानातली हिरवी भाजी, ठेचा आणि ज्वारीची भाकरी करतात. दुसऱ्या दिवशी खास जेवण. १६ भाज्या, १६ चटण्या, १६ पक्वान्ने. जणू हा समृद्धीचा, कृषिलक्ष्मीचा सत्कार. अन्न देणारी अन्नदा म्हणून भरपूर पदार्थ करतात. दिवे सुद्धा ज्वारीची... मुख्य धान्याची उकड काढून करतात.
 अलक्ष्मीचे शोभन नाव शुभा आहे. 'शुभा' चा अर्थ शेण असा आहे. शेण... विशेषत: गायीचे शेण जंतुनाशक असते. भारतीय जीवनात मडके, सूप, शेणाचे सारवण, शेणाची गोवरी यांना विशेष महत्व आहे. गोवरीच्या धुराने घर शुद्ध होते.

रुणझुणत्या पाखरा / ३३