पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या दिवशी पाटावर नवे गहू पसरून त्यावर या कुंड्या ठेवतात. रोज पूजेनंतर जवळच्या विहिरीवर वा तळ्यावर सगळ्या जणी मिरवत गाणी गात जातात. दोन कळशात पाणी घेऊन येतात. एक शिव तर दुसरी पार्वती. ते कुंडीत टाकतात. दुसऱ्या दिवशी त्यांचे लग्न. अगदी सात फेऱ्यांसह. ज्या दिवशी महाराष्ट्रात चैत्रगौर मांडली जाते त्या दिवशी.. चैत्र शुक्ल तृतियेला, राजस्थानी गणगौर विसर्जित केली जाते. तिचे माहेरपण संपते. जातांना गव्हाच्या पिठात गूळ तूप घालून त्रिकोणी मुटके तळतात. त्याला फळ म्हणतात. गव्हाच्या पिठाच्या तळलेल्या डबीच्या आकारात सात फळे ठेवतात. त्यात फणी, काजळ कुंकवाच्या डब्या तळून ठेवतात. त्या दिवशी चंदनबटव्याची, (तो थंड असतो) भाजी करतात. न मिळाल्यास मेथी.. हरभरा.. पालक अशी हिरवी भाजी करतात. मुलीच्या विवाहानंतर या व्रताचे माहेरी उद्यापन होते. म्हणजे हे व्रत कुमारिकांचे नंतर सुवासिनींचे असते. घराला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन गौर परत जाते...
 थंडीच्या काट्याने मोहरलेली आंब्याची राने फाल्गुनच्या अखेरीस बाळ कैऱ्यांचे झुलते डूल कानात घालून वहात्या वाऱ्यासोबत ठुमकू लागतात. चैत्राचे.. चैत्री पाडव्याचे, झोक्यावर बसून हिंदाळणाऱ्या गौरीचे, त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या महिलांना एकत्र आणणाऱ्या हळदी कुंकवाचे वेध मराठी घरातल्या नववयसा लेकी बाळींना लागतात. एकत्र येऊन फराळाचे पदार्थ, गौरीची सजावट, अंगणात रांगोळ्या घालून चैत्रांगण सजवायचे...
 आम्ही भारतीय सण, उत्सव, विधींवर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो. काही महिने तर सण उत्सवांनी बहरलेले. श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष, पौष, चैत्र.. यादी वाढतच चाललीय. चैत्र आला की गवरण्यांची सजावट, ओल्या हरबऱ्याची उसळ, कैरीची सणसणित फोडणीची खमंग वाटलेली डाळ, मस्त मधुर कैरीचं पन्हं. सुटलं ना तोंडाला पाणी? चैत्र म्हणजे नव्या वर्षाचं स्वागत. ते संपूर्ण भारतात विविध रितीनी होते. कश्मिरात चैत्राला चिथुर म्हणतात. पाडव्याला नवरोज किंवा नवरेह. या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. आदल्या रात्री एका थाळीत तांदूळ, बदाम, दही, फुले, रूपया, आरसा, नवे पंचांग आणि मीठ ठेवतात. नवरेह रोजी घरातली सून पहाटे सर्वांना उठवते. प्रत्येकजण अन्नदेवतेला प्रणाम करतो. आरशात पाहून हसतो. वर्ष हसतमुखाने जाते. धान्यलक्ष्मीचेच नाही तर गृहलक्ष्मीचे.. घरातल्या अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरवात करावी हा हेतू.
 तर केरळमध्ये या दिवसाला 'विषु' म्हणतात. उठल्यावर अन्नाचे.. शुभ आणि जीवन देणाऱ्या वस्तूंचे दर्शन व्हावे म्हणून रात्रीच. काशाच्या भांड्यात तांदूळ पसरून

२८ / रुणझुणत्या पाखरा