पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यातही एकत्र येऊन खेळण्यावर भर असे. तेव्हापासून स्त्रियांच्या व्रतांतली, विधींमधली सामूहिकता मनाला आगळी वेगळी वाटत असे.
 विवाहानंतर आंब्याला आले. माहेश्वरी... राजस्थानी घरातील सून म्हणून. तिथेही स्त्रियांच्या नव्या विधी, व्रतांचा अनुभव सहभागी होऊन घेतला. महाराष्ट्रपासून दक्षिणेकडे सर्वसाधारणपणे अमावस्येनंतर नवा महिना सुरू होतो. तर उत्तरेकडे पौर्णिमेनंतर सुरू होतो. फाल्गुनी पौर्णिमेनंतर चैत्र सुरू होतो. तर महाराष्ट्रात फाल्गुनी अमावस्येनंतर.
 ...होळीच्या दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या दादीजी घरातली मोठ्ठी कढई डोक्यावर पालथी घालून लगबगा मोठ्या घरी आल्या.
 'बाई' सुवारं गौर बेठवाळी हं. थाकी नई देवरानी पूजा करी कांई?'
 'न कराया काय झालं? आता आपली झालीये ना? सगळं करील.' भाभीजींचे उत्तर. मग बड्डी तीज.. हरियाली तीज, शिळा सात, गणगौर यांत मीही उत्सुकतेने सामील झाले.
 वर्षे भरारा भरारत होती. लोकसाहित्य, त्यातील स्त्रियांची व्रते, विधी, गाणी यांत मन गुंतले आणि विशेष अभ्यासाचे शोधनाचे क्षेत्र म्हणून 'स्त्रियांची विधी, व्रते, उत्सव यातील सामूहिकता' हा विषय निश्चित केला.
 फाल्गुन उजाडला की घरादारातील पोरीसोरींना आणि नव्यानवेल्या 'बिनणीनां' गोर पूजण्याचे ...त्यासाठी माहेरी जाण्याचे वेध लागत. सुहासिनीही गणगोरीची आतुरतेने वाट पहात. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्तरेतल्या.. राजस्थानातल्या चैत्र प्रतिपदेच्या दिवशी गोर (गौर) माहेरपणाला येते. होळीची राख सुफलनासाठी अत्यन्त चांगली. या राखेचे १६ मुटके, शेणाचे १६ मुटके करतात. भिंतीवर ओल्या हळदी कुंकवाचे १६/१६ ठिपके रेखाटतात. त्या खाली ते मुटके मांडतात. ते गौरीचे प्रतिक. पहिल्या दिवशी गव्हाच्या नव्या ओंब्यांनी, दुसऱ्या दिवशी हळदीने पूजा करतात. सातव्या दिवशी भिंतीवर काजळाचे १६ ठिपके मांडून खाली दोन कुंड्या वा मडकी काव, चुना यांनी सुंदर रंगवून त्यात होळीची राख शेण, माती घालून, त्यांत गहू, साळ, सरकी, ज्वारी, तूर, हरभरा अशी सात प्रकारची धान्य पेरतात, आणि गौरीच्या मुटक्यांजवळ ज्वारीचे कणिस त्याला पांढरा दोरा बांधून उभे करतात. तो 'ईसर' म्हणजे ईश्वर.. शंकर. त्याच्या जवळ दुसरे कणिस, त्या कणसाला केसाचा गुंता आणि लाल पिवळा शुभकारक दोरा बांधतात. त्याला मोळी म्हणतात. ते कणिस..ती गौर... गौरी.

रुणझुणत्या पाखरा / २७