पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यावर कोन्ना नावाच्या झाडाच्या फुलांची आरास मांडतात. त्यात सोन्याचे दागिने, रुपये, मोठी पिवळी काकडी, नारळ, शुभ्र वस्त्र ठेवून दोनही बाजूंनी समया चेतवून ठेवतात. या सजावटीला 'विषुकणि' म्हणतात. सकाळी उठल्यावर पहिले दर्शन विषुकणीचे.
 आसाम तर नृत्यसंगीताने नटलेला. पण तिथे वैशाख प्रतिपदेस नवे वर्ष सुरू होते. या दिवसाला 'रंगाली बिहू' किंवा 'बहाग बिहू' म्हणतात. कडू लिंबाची डहाळी घराघरात बांधतात. महिनाभर त्याच्या कोवळ्या पानांची गूळ घालून चटणी हवीच. बंगालमध्येही हाच दिवस नव्या वर्षाचा. वहीची पूजा करतात.
 महाराष्ट्रातही चैत्री पाडव्याला वहीची, पाटीवर काढलेल्या शारदेची... १ हा आकडा एकापुढे एक असा, पांच..सात वेळा मांडायचा आणि वर रफार..आकृतीमय सरस्वतीची पूजा करतात.
 'गौर' म्हणजे पार्वती, चैत्र तृतियेला ती माहेरपणाला येते. ती थेट अक्षय्य तृतियेपर्यन्त माहेरी राहून घराला अक्षय्य धान्यसमृद्धीच्या शुभेच्छा, आशीर्वाद देऊन सासरी जाते.
 हे महिने उन्हाचे. ओरिसात तर तीन आठवडे चंदनोत्सव करतात. चंदनाचे तेल, पंखे एकमेकांना देतात. उन्हाची तलखी सुद्धा सुसह्य करण्याची रीत.
 भारतीय सण खानपानाच्या रितीभातीतून सामाजिक आरोग्याची, ऋतूमधील बदलत्या निसर्गाच्या स्वागतास, धान्यलक्ष्मीशी जोडलेले आहेत. कडुलिंब आरोग्यदायी, गूळ थंड, कैरी चवदार.. भूक वाढवणारी. या सुमारास गहू, मोठी ज्वारी यांची खळी होऊन गेलेली. म्हणून पूजेत त्यांना स्थान.
 भाद्रपद अश्विनात पावसावर पोसली जाणारी पिके तरारतात. त्या काळात हादगा, बदकम्मा, भुलाबाई, सांझी, नवरात्र यासारखे समूहाने साजरे करायचे सण, व्रते येतात. जमिनीची उर्वराशक्ती वाढून धान्यलक्ष्मी घरी यावी, ती वाढावी म्हणून हे सामूहिक विधी. मार्गेसरी पासून वैषाखापर्यन्तचे सण सूर्याच्या पूजेचे. सूर्याला 'अपागर्भ' ...गर्भात पाण्याचा साठी असणारा म्हटले आहे. सूर्य प्रखरपणे तळपावा, भूमीची पाणी रिचवण्याची शक्ती वाढावी, ज्यामुळे तिची सर्जन शक्ती वाढेल या शुभेच्छेने पौषातले रविवार, सक्रान्त, चैत्र पाडवा, गणगौर.. चैत्रगौर, अक्षय्य तृतीया यासारखे सण साजरे करण्याची लोकपरंपरा, तीही समूहाने. एकत्र येऊन गाणी गात.

रुणझुणत्या पाखरा / २९