पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 उमलत्या वयात 'का' हा प्रश्न मेंदूत उगवला की मनाच्या क्षितिजात नवनव्या चांदण्या चमकू लागतात. त्या मिणमिणत्या प्रकाशामागच्या शोधाचा ध्यास लागतो. ..माझे आजोबा असेपर्यन्त सण-वार माहेरच्या समाजवादी घरात खाण्यापुरते साजरे होत. नागपंचमीला तांदुळाच्या रव्याची खमंग खांडवी होत. कोकणात व देशावरही या दिवशी चुलीवर तवा चढवत नाहीत. पंचमीच्या आधीपासून रात्री गल्लीतल्या महिला एकत्र जमत. फेर धरून गाणी म्हणत. मराठा, माळी, साळी, ब्राह्मण.. सर्व जातीच्या बाया हातात हात घालून फेर धरीत. नंतर आमची लाडकी भुलाबाई भाद्रपद पौर्णिमेला घरी येई. कोनाड्याला मखर लावून, तोरण बांधून तिला, तिच्या भुलाजीला आणि त्यांच्या गणेश बाळाला, त्यात 'बसवले जाई' मग सर्व जातीजमातीच्या मुली सायंकाळी शाळा सुटल्यावर एकीमेकींच्या घरी टिपऱ्या घेऊन फेरधरून गाणी म्हणायला जात. चारपाच गाणी म्हटली की खाऊ मिळे. अर्थात् आधी तो ओळखण्याचा विधी असे. सात आठ घरचे नवनवे खाऊ खाऊन घरी येई पर्यन्त रात्रीचे आठ वाजून जात. मंगळागौरीची पूजा. मैत्रिणीच्या घरी नव्या नवलाईच्या भावजयीची नाही तर काकूची मंगळागौर असे. मग फुलं, दुर्वापत्री गोळा करून सुंदर सजावट करण्याची, संध्याकाळच्या फराळाची, रात्रीच्या जागरणाची नि सूप नाच, फुगड्या झिम्मा, 'खुर्ची का मिर्ची' खेळत नवविवाहितेला फेरात अडकवून नाचण्यात व तिला फेरा बाहेर पळू न देता नाव घ्यायला (अर्थात नवऱ्याचे) लावण्यात वेगळीच धमाल असे. या फेरात सत्तरी गाठलेल्या आज्या, पणज्याही सामील होत. ही सर्वच व्रते, त्यातील खेळ, जागरण

२६ / रुणझुणत्या पाखरा