पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ६ मे ला कलकत्त्याला प्रयोग होता. हैद्राबाद ते कलकत्ता सुमारे दीड हजारापेक्षा जास्त किलोमीटर्स चे अतंर. राजमुंडीच्या अलिकडे गोंदावरी अनेक हातांनी बंगालच्या उपसागराला भेटायला धावू लागते. या प्रवाहांवर ॲनिकट नावाचा सात किलामीटर्सचा पाणरस्ता आहे. हे प्रवाह खोल नसतात. तिथे कमी उंचीचे पूल. जमिनीवर किंचित उंच पक्का रस्ता. सायंकाळी हे रस्ते बंद केले जातात. आम्ही तिथे पोचलो तर अनेक वाहने आमच्यापुढे. संध्याकाळ झाली. आपण राजमहेन्द्रीला पोचू या हिशेबाने. जवळ खाण्यासाठी फक्त चुरमुरे अलिकडच्या लहान गावातल्या डाक बंगल्यात आमचा मुक्काम. रात्री अचानक अवकाळी पाऊस आभाळ कवेत घेऊन कोसळू लागला. सकाळी नवे संकट समोर. ॲनिकट पार उध्वस्त झालेला. ०३ मे ची सकाळ. ०६ मे ला कलकत्ता गाठायचे. कवी वसंत बापट, लिलाधर हेगडे, वर्देकाका सगळेच अस्वस्थ. इतक्यात समोरून एक माणूस तराफ्यावरून नदी पार करून आला. लगेच बापटकाका धावले. तो अधिकारी होता. त्याच्याशी विनवणीवजा चर्चा. यशवंतरावजी, काकासाहेब गाडगीळ यांची ओळख वगैरे. मग त्याने एक प्रचंड मोठा तराफा मागवला. तो तराफा. त्यावर आमची साठमाणसांची बस. त्यात आम्ही. हलायचे नाही. बोलायचे नाही या सूचना. एकदाचे आम्ही पल्याड पोचलो. राजमहेन्द्रीत उपाशी पोटांनी भरगच्च जेवून पुन्हा प्रवास सुरू. घनदाट जंगलातून. वाटेत एक भलामोठा जाडजूड पिवळा अजगर उजवीकडून डावीकडे गेला. बस बऱ्यापैकी वेगात, ब्रेक मारला तरी तो जखमी झाला. गाडीच्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली. जखमी अजगर दूर जाऊ शकत नाही तो मरतोच, आणि तसेच झाले. एवढा प्रचंड अजगर पुन्हा कधी पाहणार? राणीची बाग नाहीतर सर्पसंग्रहालयात. पण ते पिंजऱ्यातले. ओरिसात महाकाय महानदीने अडवले. तिथेही तराफा नाट्य. सततचा प्रवास. पोटात न मावणारी भूक..असनसोल जवळच्या पेट्रोलपंपावर प्रत्येकी अर्धा पराठा, एक लोणच्याची फोड नि बटाट्याच्या भाजीचे दोन तुकडे यावर भूक भागवली. कलकत्ता गाठेस्तो संध्याकाळचे चार वाजलेले. पूर्वेकडे पाचलाच अंधारते. महाराष्ट्र मंडळाने सगळ्या खोल्या उघडून दिल्या. मग आंघोळी. थोडेफार खाणे. आणि ठीक ०६ ला पडदा वर गेला. त्या दौऱ्यातला तो सर्वोत्कृष्ट कार्यक्रम...
 ४७ वर्षापूर्वी ०१ मे १९६० ला महाराष्ट्र दर्शनचे पहिले सादरीकरण दिल्लीत झाले. सुरूवात पहाटे येणाऱ्या जागल्या... मागत्यांपासून होई. मग त्यात वासुदेव, . वाघ्यामुरळी, जोगी असत. २ तास ५० मिनिटांचा बांधीव, आखीव, रेखीव कार्यक्रम. रचना कविवर्य वसंत बापट यांची. संगीत दिग्दर्शन वसंत देसाईंचे. महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनात मंगळागौरीच्या निमित्ताने रात्रीच्या जागरणात खेळले जाणारे विविध खेळ.

रुणझुणत्या पाखरा / २३