पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  ०१ मे १९६१ ची संध्याकाळ राष्ट्र सेवा दल कलापथकाचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा नृत्यनाट्य संगीतावर आधारित कार्यक्रम हैद्राबादला खुल्या रंगमंचावर सादर होत होता. प्रमुख अतिथी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ समोर बसलेले. अधुक्या उजेडात संत तुकाराम टाळ चिपळ्यांवर अभंग आळवताहेत.

कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे
तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा

 मागे पांढराशुभ्र छाया नाट्याचा... शॅडोप्लेचा पडदा. त्यावर छाया दिसताहेत. अंगावर शेला, मुडांवळ्या, नऊवारी लुगड्यातली नववधू. मागे वळून पहातेय. तिचा शेला पांघरलेला हात आर्ततेने आईकडे ओढ घेतोय. आईचा एक हात, सोडून जाणाऱ्या लेकीची समजावणी करतोय. तिच्या दिशेने दिलासा देत झेपावतोय. मंदिल बांधलेला पुढे ओढ घेणारा ताठ नवरदेव. त्याच्या उपरण्याला शेल्याची बांधलेली गाठ. ओढली जाणारी. छाया नाट्यातल्या सावल्यांचा खेळही विलक्षण बोलका. स्नेहल भाटकर किंवा शरद जांभेकरांचा भावगर्भ स्वर. शिवाशी एकरूप व्हायला आतुरलेल्या जीवाच्या मनाची तगमग.
  स्वामीजींच्या डोळ्यातून घळघळा पाणी ओघळत होते.

२२ / रुणझुणत्या पाखरा