पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिले. पाठीवर दिलाशाची थाप दिली. आणि एक नवी प्रयोगशाळा सुरू झाली. दर शनिवारी, रविवारी ही तरूण मंडळी डोंगरात जात. दगड गोटे घेऊन उतारावरच्या अरूंद घळी भक्कमपणे बंद करून टाकत. उतारावर एकाखाली एक बंद केलेल्या घळी तग धरलेल्या वाळक्या बाभळी पिंपळा भोवती खंदून आळी केलेली. चाराचे दहा, वीस...पंचवीस. पोरं आणि पोरी. गावातल्यांनाही उत्सुकता. मग तेही सामील. मग यायचा तेव्हा पाऊस आला. नि काय? ... त्या घळीतलं पाणी क्षणभर थांबत थांबत इकडे तिकडे पाहू लागलं. बाभळ पिंपळाखालची आळी टचाटच भरली. गेल्या सालपेक्षा त्या डोंगरातली हिरवळ जावळासारखी झुलु लागली. तरूणांच्या मनातले बळ दुप्पट झाले. ही आगळी वेगळी बिनभिंतीची प्रयोगशाळा चहुअंगांनी बहरू लागली. गावातला माणूस गावात राहू लागला. झाडे लावू लागला. बरबडा खाण्याऐवजी पिवळी ज्वारी, जवस, उडिद अशी आगाताची पिके घेऊ लागला, पाणी मातीत जिरू लागले. मग सामुदायिक विहिरीची कल्पना. हा प्रयोग वंसतराव नाईकांनी शासनाच्या वतीने राबवला. शेवटी चांगल्या शासकीय योजनांचं झालं तेच या प्रयोगाचे झाले. पण मुख्यमंत्र्यांच्या या योजनेने त्या धडपडणाऱ्या तरूणांच्या मनात घर केले. मग या प्रयोगशाळेची रोजगार हमी शंभर दिवस काम देणारी. मग त्यात नवी भर. ती अशी. बायांना एक तास लिहायला वाचायला शिकवायचे. अन् तो तास कामाचा धरायचा काही दिवसात म्हाताऱ्या, तरूण सगळ्या बाया अंगठा उमटवून नव्हे तर सही करून मजूरी उचलू लागल्या. जुन्या विहिरींचे झरे जिवंत होऊन झिरपू लागले. मग प्रत्येक खेड्यात धावणारी एस. टी., १० वी पर्यंत शाळा, शिकणाऱ्या.. खेळणाऱ्या मुली.. आणि २५ वर्षानंतर आज?

भिरभिरणाऱ्या पायांना
मिळालाय विसावा
उजाडणारा प्रत्येक दिवस
वाटतोय नवा
दांडातून खेळतयं झुळझुळतं पाणी
दीड दोन एकराची मालकीण
गातेय सुगीची गाणी.

 ही अशी गोष्ट. सुफळ होऊन संपूर्ण होण्याच्या दिशेचा शोध घेणारी. ती वाचणाऱ्यालाही सुफळ होवो.

रुणझुणत्या पाखरा / २१