पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डोक्यात एकच समीकरण पक्के झाले. शासन हा 'देता' आणि नागरिक हा 'घेता'. जे संघटित झाले त्यांनी घेराव, मोर्चे, हल्लाबोल, उपोषण वगैरेंच्या मार्गांनी शासनाकडून जमेल तितके मिळवायचे! सामान्य माणूस मात्र आहे तिथेच. आशाळलेला आणि ओशाळलेला.
 निसर्ग आणि नियतीच्या धक्क्यांनी माणसे आतून हलतात. डोकी धावू लागतात. विशेषत: तरूणांच्या मनातली उर्जा जागी होते. फुलत जाते. आणि तसेच झाले. काही हातात हात घालून फिरणाऱ्या तरूणांना स्वप्ने पडू लागली. दगडातून झिरपणाऱ्या झुळझुळत्या पाण्याची. स्वप्ने. पण ती मृगजळ होती?
 ...एक दिवस तिघे चौघे तरूण डोंगरावरच्या एका उमाठ्यावर उभे होते. थांबत थांबत उतरत जाणारा डोंगर उतार. आणि थेट खाली पूर्व पश्चिम पसरलेली वाळूची रूंद नदी. म्हणजे पट्टा. मैलोनमैल पसरत गेलेला. तिचे नाव नीलगंगा
 मग त्या तरूणांपैकी एकाने विचारले. "भाऊ, हितं पाण्याचा थेंब नाही नि नीलगंगा कसं हो नाव या वाळूच्या पट्ट्यांचं?"
 'अवं दादा आमची आजीमाय न्हान व्हती तवा लई मोठं जंगल व्हतं म्हन हितं. ही निळाई बारमास वहायची. रातच्याला बिबठे, कोल्हे फिरायचे. बाया पहाटे पानी भराया, धुनं धुवाया जायच्या तवा दिसायचे. हरेक खेड्यातलं एखाद दुसरं जनावर, कंदीतरी सुगी राखणाऱ्या गड्याला ओढून न्यायचे. या डोंगराळ भागात पीक पिवळ्या जवारीचं आन् जवसाचं. मोठ्या जवारीची भाकर सणासुदीलाच. दुभत्या गायी म्हशी, मेंढरं लई होती. पाटील देसमुखाची घरं हाताच्या बोटावर मोजावी इतकी. एखादं बामणाचं. पुजेला तो नि मर्तिकेला तोच. एखादं मारवाड्याचं दुकान. दुकानदार नि सावकार तोच. या भागात वस्ती धनगर, हटकर, वंजारी, आन् शिवे भाईर त्यांची.' गावात राहणारा एखादा काटक म्हातारा अशी माहिती देई. मग ही तरूण पोरं त्या शब्दांमागचा शोध घेत.
 दिवस उलटतच असतात. तसे ते उलटत होते. पाऊस बऱ्यापैकी पडू लागला. पोरं उत्साहानं डोंगरात गेली. पण काय? पाणी सगळं वाहून गेलेलं. नाही म्हणायला खुरट्या गवताचे गालिचे. झाडे टवटवून जीव वाचवून उभी. निळाई कोरडाईच!
 मग दुप्पट वेगाने डोकी चालायला लागली. नवेनवे प्लॅन्स घेऊन पुण्यामुंबईकडे धाव. डोक्यातली स्वप्ने जमिनीवर उतरवायची झाली तर तल्लख, अनुभवी साथ हवी आणि पैसाही. एका ज्येष्ठ निनावी व्यक्तीने दहाएकर नाठाळ डोंगर खरेदी करायला, पैसे

२० / रुणझुणत्या पाखरा