पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ...दिपा मेहेताचा 'वॉटर' हा चित्रपट बघायला मिळणे एक अस्वस्थ अनुभव. कल्याणीच्या पुनर्विवाहाला नाकारणाऱ्या मधुमिताच्या पोटऱ्या, पायांनी चेपतानां तिच्या अंगावर दणादणा नाचून...तुडवून छुंईयाने व्यक्त केलेला संताप. होळीच्या वेळी छुंईयाला कृष्ण बनवून विधवा आश्रमात एकमेकींच्या अंगावर गुलाल उधळून साजरी केलेली रंगपंचमी. सारेच न विसरता येणारे अनुभव.
 आम्ही राष्ट्रीय आणि महाराष्ट्र प्राधिकरणाच्या वतीने यावर्षी मार्च मध्ये परित्यक्ता व एकाकी महिलांचे संमेलन घ्यायचे ठरवले. विधवा हा शब्द का वापरायचा? ती स्त्री मुलांना अन्न, शिक्षण देण्यासाठी, त्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी दहा दिशा धुंडाळते. तिला भाग्यहीन का म्हणायचे? म्हणून आम्ही 'एकाकी' हा शब्द योजिला. त्यांचे दैनंदिन जगण्याचे आर्थिक, सामाजिक प्रश्न जाणण्यासाठी सर्वेक्षण पत्रिका तयार केली. वाटले होते ३००/३५० महिला येतील. आठशेच्या आसपास आकडा गेला. जिलब्या, मसालेभात खातानाची धडपड, चढाओढ..! परित्यक्तांपेक्षा एकाकी, निराधार जीवन जगणाऱ्या विधवांची संख्या जास्त, वॉटर पहातांना मला त्या परिषदेचा अनुभव आठवला.
 ... 'वॉटर'च्या चित्रीकरणाला विरोध झाला. मग पात्रं बदलली. श्रीलंकेत तो चित्रित झाला. आमच्या धर्माने समाजाच्या अंगावर केलेल्या खोल जखमा आम्ही किती दिवस झाकून पाकून ठेवणार? आमचा धर्म.. जो जन्माने दिला, मग तो कोणताही असो, निरोगी, करण्याची बांधिलकी त्या धर्माचे म्हणून आपण स्वीकारायला नको? आपले घर आपणच झाडून स्वच्छ ठेवायला हवे ना?

१८ / रुणझुणत्या पाखरा