पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कल्याणी, मुलामय आरसपानी कांतीची लख्ख गौरांगना देखणी कल्याणी. तिचे काळेभोर केस मात्र वाढलेले. शेठकडे पाठवून आश्रमाचा खर्च भागवण्याचे मधुमिताने शोधलेले माध्यम. मनाने मलीन न झालेली अनाघ्रात अशी कल्याणी, छुंईयावर सतत पाखर घालणाऱ्या दोन पक्षिणी. कल्याणी आणि शकुंतला दिदी. कल्याणीने स्वत:ची माया ममता बारक्या काळू कुत्र्यावर पांघरली आहे. छुंईया पण त्याच्यात रमते. रात्रंदिवस. एक दिवस ते छुंईयाच्या हातून निसटते नि रस्त्यावरून धावू लागते. मागे सुसाट धावणारी छुंईया. नारायण त्याला उचलतो तिथे धापा टाकत पोचलेली छुंईया. मागोमाग कल्याणी. नारायण गांधीजींच्या विचारांवर श्रद्धा असलेला तरूण वकील. श्रीमंत सेठचा एकुलता एक मुलगा. प्रथमदर्शनीच कल्याणीच्या प्रेमात खोल बुडालेला. छुंईया बद्दल आस्था, करूणा.
 

'माझ्या आईचं ऐकून बाबूजींनी माझं लग्न केलं असतं तर छुंईया एवढी बेटी असती मला.' नारायण.
 निरभ्र मनाचा नारायण आईला विधवेशी लग्न करणार असल्याचे सांगतो. कल्याणीला घरी घेऊन जायला येतो. कल्याणीच्या विवाहाचे लाडू, पुरी खाण्याची स्वप्ने पहाणारी छुंइया, कल्याणीच्या पुनर्विवाहाला मधुमिताचा विरोध. मधुमिता संतापाने तिचे केस कापते. तरीही इतर सर्वांच्या निःशब्द शुभेच्छा घेऊन कल्याणी नारायण बरोबर नावेत बसते. नारायण पल्याडच्या तीरावर असलेला त्याचा वाडा तिला दाखवतो. कल्याणी चमकते आणि दृढ शब्दात सांगते, नांव परत मागे फिरव.
 ...तो वाडा. ज्या सेठकडे मधुमिता कल्याणीला रात्री पाठवीत असते. त्या सेठचा असतो. आणि जगण्याचा अर्थ हरवलेली कल्याणी एक दिवस गंगेत नाहीशी होते. मधुमिताशी खिडकीतून गप्पा मारणारा, तेथील सुंदर विधवांना रात्रीचा शेठ शोधून देणारा एक 'तृतीय-पुरूषी'. मधुमिता छुंईयाला त्याच्या बरोबर सेठकडे पाठवते. परंतु पांखर घालणारी दुसरी पक्षिणी हा डाव उधळते. छुंइयाला कडेवर घेऊन पळत सुटते. नारायणाला शोधणार कुठे नि कसे? पण अलोट गर्दी रेल्वेस्टेशनकडे धावणारी. महात्मा गांधीजी रेल्वेतून जातांना वाराणशीला दोन मिनिटे थांबून लोकांसमोर बोलणार असतात. तिथे गांधीभक्त नारायण नक्कीच असेल. पुन्हा छुंईयाला कडेवर घेऊन जीव समर्पून धावणे.
 ..गाडी सुटली आहे. दरवाजात नारायण. शकुंतला दिदी, चालत्या गाडीत छुंइयाला त्याच्या हातात देते. नारायणच्या डोळ्यातली आश्वासकता आणि छुंइयाचे तृप्त निरागस डोळे, शकुंतला दिदीला जगण्याचे अर्थ ...संदर्भ सापडल्याचा निरामय अनुभव.

रुणझुणत्या पाखरा / १७