पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 निरागसतेच्या कोमल झाडाला आलेले ते गोंडस फूल. त्या फुलांचे नावं आहे छुंईया. आपल्याला त्या फुलाचे दर्शन उरात ठसून आठवते, ते त्याच्या डोक्यावरचे काळेभोर केस कापताना. हजामाचा वस्तरा त्या निरागस लेकराच्या डोक्यावरून फिरतोय. कारण सात वर्षांची छुंईया विधवा 'विगतः धवः' भाग्यहिन आहे. तिचे दर्शनही पापाचा शिडकावा करणारे आहे. पण तिचे डोळे? अम्माचा ...आईचा शोध घेणारे. गंगेकाठच्या विधवाश्रमात सोडून जाणाऱ्या वडिलांना तिच्या जगण्याचा, अस्तित्वाचा अर्थ विचारणारे. अत्यंत निरामय, कोवळी नजर पांढऱ्या वस्त्रात आकंठ लपेटलेला चिमणा देह. तो भवतालच्या माणसांना वाहत्या गंगेला काहीतरी विचारतो आहे. त्या आश्रमात भवताली शुभ्र, एकवस्त्रांकिता विधवा आहेत. विविध वयाच्या, विविध आकाराच्या, विविध आवाजाच्या, विविध नजरेच्या. स्वत:च्या आशा आकांक्षा, इच्छा, राग, लोभ, द्वेष... सारे पांढऱ्या वस्त्रात बांधून श्वास मोजून जगणाऱ्या. त्यात एक ऐंशीचा घाट पार केलेली वृद्धा. बुंदीच्या लाडूसाठी तरसणारी. तो मिळताच कायमचे डोळे मिटणारी. अर्थात हा लाडू देण्याचे धाडस छुंईयाच करणार.
 'सप्तवर्षात् भवेत् कन्या' अशी छुंईया आश्रमात येते आणि सगळ्यांच्या एकसुरी जगण्यावर एक कोमल रंग चढतो. त्या आश्रमाची प्रमुख ढोलमटोल मधुमती. छुंईयाला अम्माकडे जायचेय. तिला पकडून आणायला सांगणाऱ्या मधुमिताला ती दुधाच्या दातांनी कडकडून चावते. कौतुकाची तृप्त लहर इतर सगळ्या विधवांच्या चेहेऱ्यावर.

१६ / रुणझुणत्या पाखरा