पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वकीलसाहेबांनी अत्यंत हळुवारपणे आणि जीव लावून ते सत्य पत्नीला स्वीकारण्याचे धाडस दिले. आणि वचन घेतले. मृत्यू हा प्रत्येकाचा साथी आहे. आज मी उद्या तू. पण आपल्या जीवनात आपले जे भावबंध जुळले तीच आपल्या दोघांची खरी संपत्ती. 'मी नसलो तरी मी तुझ्या मनात असणारच. आपल्या नातवंडांतून असणार.. मी गीतेचा सेवक. माझ्या शेवटच्या क्षणी तुझ्या ओठातून बहरणाऱ्या गीतेच श्लोक ऐकत मला शेवटचा श्वास घ्यायचाय..मी तुझ्यात आहेच. परंपरेने स्वीकारलेले सौभाग्यलेणे केवळ माझ्या असण्याची खूण नाही. तू माझे जीवन फुलवलेस, मला भाग्यवान केलेस. तू माझी सुभगा आहेस. तू सौभाग्य लेणे उतरवायचे नाहीस. ते तुझे आणि माझे सौभाग्य आहे. आपल्या कुटुंबाला भाग्य देणारे तुझे कपाळ पांढरे राहणार नाही. सर्व सौभाग्यलेणी तू उतरवणार नाही असे आश्वासन मला दे..'
 वकीलसाहेबांना दिलेले आश्वासन त्यांच्या सखीने पाळले.
 अगदी परवा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. कुंकवाने रेखलेले सुभग कपाळ, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र अशी ती सुभगा नातवाला खेळवीत अंगणात स्वागताला उभी होती...माझे स्वागत तिनेच केले. संध्याकाळी परत निघाले. "बाई, देवघरातली समई चेतवना ना?' सुनेने हाक दिली. मराठवाड्यात राजस्थानी कुटुंबात आईला 'बाई' म्हणतात.
 त्यांनी निघताना मला कुंकू लावले. खणानारळाने माझी ओटी भरली. ती सुभगा सावित्री नेहमीच मनात उगवलेली असेल.

रुणझुणत्या पाखरा / १५