पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या सहचराला प्रश्न विचारून भंडावून सोडणारी. आणि तो चुकतोय असे वाटले तर त्याच्याशी भांडणारी. त्यालाही सल्ला देणारी. अशी 'पूर्णा'.
 या दिवशी मोठ्या मुलीला रात्री आई ओवाळते. हा मान ज्येष्ठ मुलाला नाही हं. कोजागिरी म्हटले की आटवलेले दूध हवेच. पावसाचे दिवस ओसरलेले. भरपूर हिरवा चारा नदी नाले वाहणारे. जनावरांनाही विश्रांती मिळण्याचे दिवस. रब्बीच्या पेरणीची तयारी किंवा पेरणी सुरू. अशा वेळी

वावर फुललंय,
जित्राप झुललंय,
साळूनं घातली भलरी... म्हणावेसे वाटणारच.

 पहिल्या सुगीचे धान्य हाती येण्याचे दिवस. अशावेळी गोठ्यात दुभतं बहरलेलं. दुधाची चव न्यारीच. पौर्णिमेची रात्र जागवायलाच हवी. दुधात पौर्णिमेच्या चांदण्याची शर्करा विरघळलेली. दुधाचे घोट घेत 'को जागर्ति विचारणाऱ्या पार्वतीला आपण 'अहं जागर्मि' असे उत्तर द्यायलाच हवे ना?
 भारतीय जीवनरीतीने केवळ पौर्णिमेचे पावित्र्य जाणले नाही तर त्या प्रकाशात अमावस्येचा अंधारही कर्म आणि कर्तव्याने उजळून टाकण्याच्या दिशा शोधल्या. आषाढातल्या अमावस्येला दीपपूजा केली जाते. वा दिवाळीची सुरूवात धन त्रयोदशीने होते. तर अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. खरी दिवाळी तीच. लक्ष्मी, केवळ चांदीच्या नाण्यांची वा सोन्या मोहरांची नाही.

...दिन दिन दिवाळी,
गायी म्हशी ओवाळी
गायी म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या....

 आमची संपत्ती...लक्ष्मी, शेतभात, जनावरे, दुभते यांत आहे. आणि आमचे आदर्श पुरुष गुरे राखणारा कृष्ण, लक्ष्मण, शेतात श्रम करणारा बळिराजा. ह्या सर्वांच्या श्रमावरच आपल्या सर्वांच्या जीवनात पौर्णिमा प्रकाशत असते.

१२ / रुणझुणत्या पाखरा