पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यावेळी बिनणी, टाबरटुबर, मोट्यार शब्द कळले नाहीत 'रसोईवाल्या दादीजींना जेवू घाल... बिरामणी म्हणजे ब्राम्हणबाई' ऐवढे अंदाजाने कळले. आज कधीतरी भेटणाऱ्या नातलगांना मी मीरवाडीत सहजपणे बोलतेय हे पाहून आश्चर्य वाटते. भाभीजी मात्र हसत सांगतात 'न आवान कांई हुयो ए कालिजमा मराठी भाषाकी मास्तरणी हे. किशीभी भाषा आवेच ना?'
 हळूहळू मी घरात लोणच्यासारखी मुरत गेले. आणि प्रश्नही विचारत गेले. प्रत्येक पौर्णिमेला मोठ्या घरी जेवायला जाणे, पुरणावरणाचा स्वयंपाक वगैरे सुरूच होते.
 'भाभीजी, प्रत्येक पौर्णिमेला पुरणाचा वाटण्याघाटण्याचा स्वयंपाक म्हणजे घरातल्या बायकांची कंबर तोड. (तेव्हा मिक्सरचा जमाना तालुक्यापर्यंत पोचलेला नव्हता) त्यापेक्षा खीरपोळी का नाही का करू?'
 'हे बघ पोरी, पुनव म्हणजे चंद्राचा पूर्ण प्रकाश. तो समद्या जगाला शांती देतो. पुरणाचा स्वयंपाक म्हंजी पूर्णान्न. आपल्या जीवनात नेहमीच आनंद नसतो. संकटच लई. तुकाराम बाप्पा काय म्हंतात? सुख पहाता जवा पाडे दुःख पर्वता ऐवढे । पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो. पूर्ण सुखाचे रुप म्हणून पुनवेला पुरण घालायचं ग! माझ्या सासूजींना शेवटची अनेकवर्षे दिसत नव्हते पण पुनवेकडे पहाण्याची नवी दृष्टी मला त्यांनी दिली. मग मलाही नाद लागला प्रत्येक पौर्णिमेचा चन्द्र आणि चांदणरात न्याहाळण्याचा. आषाढ श्रावणातला ढगांच्या मलईदार बुरख्यातून जाणवणारा तलम चन्द्रप्रकाश. तर कवी धुवांधार पावसातली काळोखी पुनव. पण त्या काळोखावरही चंदेरी हल्लक झिलई. भाद्रपदात कधी कधी गणपतींची सजावट पार भिजून जाई. पण अनंत चतुर्दशी आणि भादव्याच्या पुनवेचा ओलाचिंब प्रकाश, आश्विन पौर्णिमा बुचाच्या झाडावर उतरून आल्याची जाणीव देई. भाद्रपदातली अवस असावी त्या अंधारात गच्चीवर निवांतपणे बसून उंचउंच सरसरत गेलेल्या बुचाच्या झाडाच्या शेंड्याकडे पहावे. आश्विन पौर्णिमा त्या झाडावर उतरून वाहणाऱ्या सुगंधी प्रवाहात नाहतांना दिसेल. बुचाला कोणी अजरणीची फुले म्हणतात. पण मी मात्र त्या फुलांना आकाश मोगरीच म्हणणार!
 आश्विन पौर्णिमेला शिवपत्नी गौरी 'को जागर्ति? को जागर्ति' असे विचारीत अवघ्या विश्वाला वेढून टाकते. ही पुनव सर्वार्थाने स्वत:च्या अस्तित्वाचा, भवतालचा निसर्ग, समाज, कुटुंब यांच्यामधले नाते यांचा निरामय होऊन शोध घ्या, म्हणून 'जागे व्हा' म्हणत रात्रभर फिरणारी पार्वती. ती एक पूर्ण माणूस... मानुषी. म्हणूनच शिवाला,

रुणझुणत्या पाखरा / ११