पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 "थांबा. यशवंता तू जातीचा नाहीस. तू एका विधवेला बळजबरीतून झालेली नीच अवलाद आहेस. जोतीरावांनी तुला दत्तक घेतले म्हणून काय झाले? जातीच्या माणसानेच त्यांच्या प्रेतासमोरचे मडके हाती घेतले पाहिजे. चला मंडळींनो परत..." तो प्रौढ गृहस्थ गडगडाट करीत बोलला.
 "थांबा" असे म्हणत ती स्त्री पुढे आली.
 'मी तर आहे ना तुमच्या जातीची? मी घेते ते मडके हाती आणि माझ्याच पतीच्या अर्थीपुढे...अंत्ययात्रेत पुढे रहाते..' ती नऊवारी लुगडे गुंडाळलेली मुलगी पुढे आली आणि तिने सुतळीने बांधलेले ते मडके हातात घेतले...
 एक विचित्र सुन्नता. इतक्यात एक कन्या उभी राहिली आणि तिने प्रश्न केला.
 'मॅडम, आपलं पथनाट्य उठावदार व्हावं म्हणून तर हा प्रसंग त्यात घुसडला नाही ना?'
 प्रश्न मला नक्कीच बोचला आणि आवडला. "बेटा जी व्यक्ती प्रत्यक्ष जगून गेली, अशा आगळ्यावेगळ्या व्यक्तीच्या चरित्रात घुसडपट्टी केली तर प्रेक्षक.. वाचक सहन करतील?.. पण हे असत्य का वाटते तुम्हाला? आपण एकविसाव्या शतकात जगतोय, म्हणून ते असत्य वाटतेय," मला मध्येच अडवीत दुसरी कन्या बोलू लागली.

रुणझुणत्या पाखरा / १३