पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसलेकी. मग आपोआप हात जोडले जात. त्यावर नव्याने झुलणारी, कोवळी... गुलबट... रेशमी पाने दिसत. दवाखान्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळांसारखा कोवळा गुलाबी रंग... आपण जन्मलो तेव्हा आपलाही रंग असाच असणार. मग तो का आणि कसा बदलला? असे हजारो प्रश्न माझ्याही मनात उगवत. या प्रश्नांची उत्तरे शाळेत गेल्यावर शिक्षकांच्या सहवासातून सापडतात. अर्थात त्यासाठीही ध्यास घ्यावा लागतो. शाळेत न जाणाऱ्या मुलांच्या मनातही असे प्रश्न उगवत असतील. पण उत्तर कोण देणार? आज काल अशा मुलांसाठीही चार तासांची शाळा चालविण्याचा प्रकल्प एनजीओ... अशासकीय संस्थांना दिला जातो. माझ्या रोजच्या रस्त्यावर अशी शाळा आहे. ११-१२ वाजता ही मुले बाहेर खेळताना दिसतात. मग गुरुजी आले की काय शिकवतात? काल काय शिकवलं? तुला चित्र काढायला आवडतं का रे? शाळेत गुरुजी कोणते खेळ शिकवतात? चौथीची किंवा सातवीची परीक्षा देणार का? मग पुढे काय ? शाळेत एखाद्या ताई शिकवतात कारे?... मी नेहमीच त्यांच्याशी गप्पा मारत असते. "आजी मला चित्र काढाया लई आवडतं. पण कागद, पेणशील कोण देणार?"
 "मला शिणमातली गाणी छान म्हंता येतात. मी कामाला जाते ना तिथं त्या चित्रांच्या पेटीत... टीवीत लहान पोरंबी छान गानी म्हंताना मी पाहिलीत.
 ...गानं म्हनल की माय गांगते.". कधी मधी माझ्या मास्तरांशीही गप्पा "भाऊ शाळेत किती लेकरं?" माझा प्रश्न. "हायता की पंचेचाळीस. पटावर" गुरुजींचे उत्तर.
 'पण दिसतात सतरा-अठराच." मी "व्हय बावीस लेकरं ऊस तोडायला गेलीत मायबापासोबत.' 'पण मग शासनाकडून पैसे मिळतात ४५ जणांचे. ते...?"
 ताई आमी पगारी नोकर पंधराशे रुपये मोजून घेतो. दुसरीकडे तर सहासातशेच मिळतात. ही संस्था नेकीची हाय. बाकीच्या बाबतीत आमी कशाला नाक

खुपसावं?..." तर हे असं गुरुजीचं उत्तर...
 जीवनात योणाऱ्या भवतालच्या माणसांची, आकाशातल्या चांदण्या... उगवता सूर्य... चंद्र, भवतालची हिरवाई, हिमालयाची बर्फाळ शिखरे, वळणे घेताना पोटात पेटका आणणारे अरुंद रस्ते, बेभान वाहणाऱ्या नद्या, उसळते सागर... अशा अनेकांशी संवाद साधण्याचे वेड तरुणाईत अनेकांना लागते. त्यातलीच एक मीही. हे वेड सांभाळता सांभाळता संध्याकाळ कधी होते ते कळत नाही. हे संवाद जणू कोमल.. शुद्ध... तीव्र... अनवट... वादी, संवादी स्वरच. कळत नकळत शब्द... अक्षरातून ते

१७० / रुणझुणत्या पाखरा