पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सुस्नात पहाट नेहमीच बहरत राहते. मग ती पहिल्यावहिल्या अनोख्या मनोमीलनाची असो, अवघ्या देहातून धुंद स्पर्शगंध लहरवत जाणारी असो किंवा जीवनात हाती येणाऱ्या पहिल्या यशाची असो. ती पहाट जीवनभर अखेरच्या क्षणापर्यंत दरवळत राहते अंगा अंगातून तनामनातून.
 आणि जीवनाची पहाट म्हणजे प्रत्येकाचं घुंगुरवाळं बालपण. माथ्यावर मायेचा, खात्यापित्या घरांचा कुटुंबवत्सल हात असावा. स्वप्नांची क्षितिजे मनात पेरणारे, ध्येयाचे कवडसे दाखवून त्यातले आवडते कवडसे हाती कसे धरावेत, तसेच त्यांच्या शोधाची दिशा दाखवणारे शिक्षक... पालक भवताली असावेत. मग ही जीवनाची पहाट अलगदपणे हाती येते. पण अशी पहाट किती जणांच्या वाट्याला येते..?
 कचराकुंडीतील कागद वेचणारी, हॉटेलमध्ये वा दुसऱ्याच्या घरी काम करणारी छोटी मुलेमुली यांच्या जीवनातही घुंगुरवाळं बालपण येतं. पण हाती येत नाही. मनात ओढ आणि काहीतरी हरविल्याची खंत जागवीत ते दुरून निघून जातं. शाळेची दारे शासनाने सताड उघडी ठेवली तरी, पोटातली भूक आणि घरातले अठराविश्वे दारिद्र्य त्यांना शाळेपासून दूरच ठेवते. बालमनात प्रश्न सतत उगवत असतात. पानांचा रंग हिरवाच का? प्रत्येक झाडांच्या पानांची हिरवाई वेगळी. काहीवर पिवळट छटा तर काहींचा रंग तांबूसपणाकडे झुकणारा आकारही वेगवेगळे. आमच्या घराजवळ मारुतीचे देऊळ होते. पिंपळ वृक्षाचा मधोमध आधार देऊन रचलेले. शाळेत जाताना ते

रुणझुणत्या पाखरा / १६९