पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साडेसहा सातच्या थंडीत ते मित्र शाळेत निघालेले. शाळेच्या ड्रेसमध्ये... अर्धी निळी पॅट आणि अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट. त्यात कुडकुडत स्लिपर घालून चालणारे तीन जण आणि एक मात्र पायात बूट. ड्रेसवर घातलेला लांब बाह्यांचा लोकरीचा स्वेटर, डोक्याला गरम टोपी आणि गळ्यात आईने विणलेला मफलर... असा एखादाच !
 ... आता ऊस गाळपाचा हंगामही सुरू झालाय. आमच्या गावाच्या आसपास अनेक साखर कारखाने, एक दिवस सकाळी फिरून येत असताना काही बैलगाड्या दिसल्या. त्यात दोन-तीन लेकरं, त्यांची माय, गाडी हाकणारा बाप, सहा-सात वर्षांची पोर तान्हं लेकरू जोजवीत गाडीत बसलेली. माय गाठोडीत चाचपीत शोधाशोध करणारी. थंडीत काकडणारं पोरगं डोळ्यासमोर पुस्तक घेऊन बसलेलं...
 काही दिवसांपूर्वी गावाकडे गेलो होतो. वाटेत साखर कारखाना लागला. तिथेही झोपड्या टाकलेल्या मजुरांच्या जोड्या कारखान्यावर कामाला येतात त्यांच्या एकच नवी आणि चांगली गोष्ट या दोन वर्षांत जाणवतेय.
 कारखान्याच्या आवारात पोरांसाठी साखरशाळा. पहिली ते सातवीच्या मुलांना शिकविणारे शिक्षक. शाळेला लागून अंगणवाडी. मुलींच्या कडेवरची लेकरं अंगणवाडीत आणि पोरी उत्साहाने शाळेत. या साखरशाळा स्वयंसेवी संस्था चालवीत असल्याने तिथले शिक्षक वेळेवर येतात. मन लावून शिकवतात. शिवाय काळा गुंडाळीफळा, रंगीत, पांढरे खडू, हजेरी पुस्तक, मधला खाऊ तोही पोटभर, वगैरे वगैरे. एकूण चांऽऽगभलंऽऽ. तर,

थंड थंड थंडी, वाजवाज वाजली
ओठांची बोबडी घशात अडकली...


१६८ / रुणझुणत्या पाखरा