पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एकमेकांच्या मिठीत विवाहाची बंधने अधिक घट्ट होत जातात. एकमेकांची खरी ओळख पटत जाते. शेकोट्यांच्या साक्षीने काही जण प्रेमाच्या नाजूक बंधनात अडकून जीवनसाथी बनतात, तर काहींची नाजूक बंधने संथ तळ्यात खडा टाकल्यावर कसे तरंग उठतात तशी क्षणिक ठरतात. तरीही ती अधमुऱ्या तरुणाईतल्या पहिल्यावहिल्या प्रीतीची आठवण असते... कधी बाबा आमट्यांच्या हेमलकसा... आनंदवनाच्या छावणीत पेटवलेली शेकोटी. भारतातून एकत्र आलेली तरुणाई. गप्पा गाण्यांची मैफल. तीही अर्ध्याकच्च्या हिंदीतली. एखादी मऱ्हाटी सावळी देखणी बाला नि काश्मीरमधला उंचपुचरा लालबुंद गोरा, सडसडीत कॉलेजकुमार नेत्र पल्लवी. मग शब्दांची देवघेव 'अरि ये थंडी तो हमारे कश्मीरमे चौबीस घंटे रहेती है। आईये हमारे यहाँ । रंग बिरंगे फूलोंकी... गुलाबोंकी घाटी हैं।'
 'बुलाओ तो सही. आयेंगे ना!'
 हां जरुर. आओगी तो वापस जाना मुश्कील होगा'
 मग उत्तराऐवजी लाजून खाली पाहून हसणे. तर कधी आंतरविद्यापीठ एन. एस. एस. शिबीरे. तीही डिसेंबर - जानेवारीच्या मुहूर्तावरची. तिथेही ज्वालांनी लहरणाऱ्या शेकोट्या आणि त्यांच्या साक्षीने फुलणारी प्रीतीची फुले.
 ..अशा फुलांच्या आता फक्त आठवणी. २५-३० वर्षे उलटून गेलेली. पण थंडीतली शेकोटी पेटली की, पांढऱ्या केसांच्या मनातही काळाआड लोपलेल्या खुणा... काही तृप्तीच्या तर काही निसटलेल्या क्षणांच्या, जाग्या होतातच!
 आताही थंडीची लाट अंगावर कोसळते आहे. अशा वेळी महाविद्यालयात असताना मनात ठसलेली गाणी आठवतातच. आणि गाणी गाणारा आवाज तबकडीत बंद करुन त्यांना चिरतारुण्याचा वसा देणारा शास्त्रज्ञ थोरच. तर ओठावर ओळी आल्याच

ठंडी ठंडी हवा
पूँछे उनका पता
याद आये सखी री,
तो झूमे बता
ठंडी ठंडी हवा ऽऽ

 आठवणींमध्येही हवीशी ऊब असतेच. कधीच न कोमेजणारी. थंडीच्या दिवसांतच दुपारी भरणाऱ्या शाळा सकाळच्या होतात. आहे ना ताप ? सकाळच्या

रुणझुणत्या पाखरा / १६७