पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'ताई, आज बोलू का तुमाले ? इतके दिस बोललेच न्हवते. तुमचं भ्यावच वाटायचं. पन आता हितं आल्यापासून जरा भीड चेपलीया. बोलू का?"
 "... अगं बोल की. काय सांगायचंय? तुला ताण पडतो का कामाचा? भाजी, आमटी तूच करतेस ना? तुझ्या हाताला छान चव आहे हं."
 "ताई, सगळा जलम लोकांचा सैंपाक आन् धुणीभांडी करण्यात, खरकटी काढण्यात गेला. धुण्या-भांड्यापरीस सैपाकात मन लई रमायचं. मन लावून फोडणी घातली की भाजीला चव येणारच की...! त्याचं काय वं कौतीक? पन् चांगलं म्हटलंत तुमी. बरं वाटलं. काय सांगू? मी ओल्या हळदीची म्हायेरला. मायकडे आल्ये, ते मला परत न्हेलंच न्हाई... त्या दादापाला माजं फेंदरं, नकटं नाक, बुटकी उंची आवडली नाही. त्याची माय मला पहायला आली वती. माज्या बापांन धा हज्जार रुपये मोजून मला त्याच्या उपरन्याला बांधलं. लगीन झालं की, तिसऱ्या रोजाला मामा येती-जाती न्यायला आला. पन पुन्ना त्यांनी घरात घ्येतलंच नाई. मायनी माप प्रयत्न केला..."
 "मला शानी हून बी लई वरसं झाली. आमच्या डोंगरात आभाळ फुटून पाऊस झाला वता. तवा मी शानी झाल्ये. लई लई वरसं झाली. मी नि मायच ऱ्हातो. भाऊ हायता दोन. पन ते कोन कुनाचे. तुम्ही म्हंता कस्टाची भाकर चवदार असती. खराय ते.

रुणझुणत्या पाखरा / १६३