पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नवरात्रोत्सव मूलतः जमिनीच्या उर्वशक्तीशी संबंधित असल्याने पहिल्या दिवशी पत्रावळीवर शेत, गोठा, तबेला, वारुळ, वडाखालची माती, चौरस्त्याची माती, हत्तीच्या पायाखालचा रस्ता, संगम या ठिकाणची माती... अशी अष्ठमृद पसरतात. त्या मातीत मिसळीचे धान्य... बीजकरण एकत्र करून मिसळतात. गावातील पाटील, देशमुख यांच्या घरातील प्रमुख महिला कारभारिण नवरात्रीपूर्वी पक्ष-पंधरवड्यात विविध बियाणे एकत्र करून ठेवत असे. ते गावातल्या छोट्या शेतकऱ्यांना, भूमिहीनांना देते. त्यात गहू, जोंधळा, करडई, धने, भुईमूग असतेच. ते तृप्त मनाने दिल्यास त्याच्या दसपट समृद्धी घरी येते अशी श्रद्धा आहे.
 घट हे गर्भाशयाचे प्रतीक आहे. या काळात भूमीच्या तीन रूपांची आराधना केली जाते. विशेष करून कुमारिकांची पूजा केली जाते. कुमारिकांचे प्रतीक सरस्वती, लक्ष्मी ही सुवासिनी आणि अनिष्टापासून रक्षण करणारी काली. ज्येष्ठ-आषाढात पेरलेले धान्य पणात येऊ लागते. दाण्यात दूध भरू लागते. या काळात धान्याने शेतेभाते बहरलेली असतात. त्यातून अन्न, धनधान्यरुपी मातृरूप सुवासिनी लक्ष्मी हाती यावी, तिचे रोगराईपासून रक्षण व्हावे, म्हणून काली... विघ्नहर्ती भवानी. घटांत विविध विहिरींचे, नदीचे पाणी ठेवतात. त्या घटातले पाणी बीजमिश्रीत मातीवर शिंपडतात. माती ब्रह्मदेवाने निर्माण केली व कश्यप मुनींनी अग्निमंत्रित केली अशी कल्पना आहे.
 नवरात्र खरिपाच्या पिकांचे स्वागत आणि रबीच्या पिकांची उगवण शक्ती मोजणारीं जणू प्रयोगशाळाच आहे. पूर्वी शेतातील परिपुष्ट निरोगी कणसे आढ्याला अलगद बांधून ठेवीत अशा कणसांचे दाणे काढून नवरात्राच्या मातीत मिसळून त्यावर घट मांडीत. अशा घटातले झिरपते पाणी बियाण्याला योग्य प्रमाणात मिळे. ज्या बियाण्यांचे अंकुर रसरशीत, जोमदार ते पीक त्या वर्षी भरारीने येणार असा अंदाज शेतकरी बांधत. माती, कुंभ तयार करणारा कुंभार यांना समाजात प्रतिष्ठा होती. लग्नात, संक्रांतीला कुंभाराचा मानसन्मान केला जातो. कुंभार मडके वाजवून पारंपरिक गीतांतून जीवनाचे तत्त्वज्ञान गातात. त्याला 'डहाका' म्हणतात. नवरात्रात घटाच्या वर रोज एक फुलांची उतरती माळ टांगतात. नवरात्राचा पाचवा दिवस म्हणण्याऐवजी पाचवी माळ असे म्हणण्याचा प्रघात आहे. दहा दिवसरात्र समईतील ज्योती तेवत्या राहतील याची काळजी घेतली जाते. दिवा सुफलीकरणाचे प्रतीक असतो.
 घट हे 'जीवा' च्या अस्तित्वाचे प्रतीक. त्यातील चैतन्याचे प्रतीक दिवा. स्त्रीचा गर्भ सुलक्षणी असावा म्हणून गर्भादान समारंभ. त्यात 'घट' पूजा असते. माणूस मरण पावल्यावरही मडके सोबतीला असतेच. पण तो 'घट' न राहता 'मडके' होते. ते मडके

रुणझुणत्या पाखरा / १६१