पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भारतीय जीवनरितीचा मूल बंध 'घट' किंवा 'कलश' आहे. बैलांचा नांगर वापरात येईपर्यंत 'स्त्री' समाजाच्या केंद्रस्थानी होती. माती, मृदघट, शेण, गोवऱ्या आणि धान्य व सूप यांना स्त्री व्रतोत्सवात महत्त्वाचे स्थान आहे. हे सर्वच व्रतोत्सव भूमीशी, तिच्यातील उर्वरा शक्तीशी जोडलेले आहेत. स्त्री आणि भूमी... माती यांच्या विषयीची कृतज्ञता त्यातून व्यक्त होते. प्राचीन भारतीय लोकजीवनाचे वैशिष्ट्य मातृसत्ता होते. हा समाज कृषीजिवी होता. कृषिसमृद्धी, जमिनीचे सुफलीकरण आणि भूमीरुप स्त्री-देवता यांच्यातील अतूट एकात्मतेचा आदिबंध समाजमनातून आजही नाहीसा झालेला नाही.
 अश्विनात नवरात्राचे घट बसतात. देवीस्वरुपातील आदिशक्तीची ती पूजा असते. तुळजाभवानी, एकवीरा, माहूरची रेणुका, अंबाजोगाईची योगेश्वरी, कोल्हापूरची अंबा... महालक्ष्मी ही देवीची मूळ ठाणी. ही सर्व आदिशक्तिपीठे फक्त स्त्री देवतांचीच मंदिरे आहेत. ती मातृरुप 'आई' ची मंदिरे आहेत. त्यांच्या शेजारी कोणताही पुरुषदेव वा सहचर नाही. त्यामागचा गूढार्थ क्रांतिकारक आहे.
 स्त्रीमध्ये निर्मिती करण्याची यातुशक्ती... जादू आहे, या कल्पनेतून आदिमानवाला तिच्याबद्दल भय वाटले. पण त्याच वेळी स्तन्य पाजणारी, बालकाची काळजी घेणारी, त्यांच्यावर कोसळणाऱ्या अशुभाचा संहार करण्यास जागरूक असलेली स्त्री सुरक्षितता देणारी असल्याचा प्रत्यय आला. संस्कृतीच्या विकासात जाणिवांच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि निर्मितीत पुरुष सहयोगाची कल्पना आली.

१६० / रुणझुणत्या पाखरा