पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिक्षणमहर्षी बाबासाहेब परांजपे यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली. निजामशाहीत होरपळणाऱ्यांना लढवय्या सैनिकांची अधिक गरज आहे हे ओळखून हिप्परगा येथील अनंतराव कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय विचारांच्या शाळेत बी. एस्सी. झालेले बाबासाहेब शिक्षक म्हणून गेले आणि निजामाविरुद्ध आंदोलनातील तरुण मनांना वाणीने चेतावणारा या लढ्यात झोकून द्यायला प्रवृत्त करणारा तरुण तेजस्वी वक्ता ही ओळख त्यांची मराठवाडाभर झाली. निजामाने त्यांनाही मृत किंवा जिवंत पकडून आणण्यासाठी दहा हजार रुपयांचे इनाम ठेवले होते. मराठवाडा १७ सप्टेंबर १९४७ रोजी मुक्त झाला. बाबांनी शिक्षणाद्वारे ज्ञान, विज्ञान, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्म समभाव, जातीविरहित समाज रचनेचे संस्कार करणाऱ्या शाळा, महाविद्यालये सुरू केली. धनिकांना त्यात सहभागी करून घेतले आणि संसारही थाटला, तोही जात परंपरांच्या सीमा ओलांडून. अत्यंत साधेपणाने आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केले. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचा अमृतमहोत्सव अंबाजोगाईत झाला. बाबा आणि सिंधूताईंनी मला एक आगळे चिरस्वरूचपी माहेर दिले. त्या समारंभात मी सहजपणे माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. ते शब्द केवळ बाबांचे न राहता अनेक ज्येष्ठ प्रेरकांसाठी आहेत.

अक्षरांना अर्थ देऊन श्वास प्रेरित चालणे
अमृता वोल्हाविती ही समर्पित जीवने...

 असे अनेक तेजस्वी 'महा तारे' होऊन गेले आहेत आणि होतील. अक्षरांना अर्थ देऊन, विचारांना तनामनात पेरत जाण्याची ऊर्जा त्यांच्याकडून ज्येष्ठांनी घ्यायलाच हवी ना?

१५६ / रुणझुणत्या पाखरा