Jump to content

पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विषयाचा शोध घेणारी असते तिला 'म्हातारी वा म्हातारा' म्हणण्याचा प्रघात होता. वृद्धत्व अनुभवाच्या समृद्धीचे प्रतीक असते. मग आजच्या विज्ञानमय युगात ज्येष्ठांना आमची 'दखल' घ्या असे म्हणण्याची वेळ का यावी? वैज्ञानिक शोधांमुळे माणसाची आयुमर्यादा सतत वाढते आहे. वृद्धांचे जगणे दीनवाणे होऊ नये यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था विविध प्रकल्पांद्वारे प्रयत्न करीत असतात. पण तरीही, वृद्धांनी संघटितपणे 'वृद्धत्व' सर्वार्थाने समृद्ध कसे होईल याची दिशा शोधायला हवी. प्रख्यात शिक्षणशास्त्रज्ञ वि. वि. चिपळूणकर यांनी 'पसायदान' ही अभिनव कल्पना मांडली. विविध खात्यांतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांजवळ त्या त्या विषयांचे ज्ञान आणि अनुभव असतो. त्याचा लाभ तो सर्वांना देऊ शकतो. एखादा निवृत्त कर्मचारी वृद्धांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ वृद्धांना मिळवून देऊ शकतो.
 'वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे' या केशवसुतांच्या ओळी आपल्याही अनुभवाला येतात. काही दिवसांपूर्वी एका गृहस्थांचे पोस्टकार्ड आले. ते आणि त्यांचे तीन मित्र काही स्वयंसेवी संस्थांचे काम पाहावे यासाठी येणार होते. अक्षर अत्यंत सुरेख. नेटके. त्यातून वयाची थरथर जाणवत होती. नळदुर्गचे 'आपलं घर', अथणी येथील ज्ञानप्रबोधिनिचा प्रकल्प व अंबाजोगाई येथील 'मानवलोक-मनस्विनी' या प्रकल्पांना ते भेट देणार होते. वृद्धत्वातही काही नवे निरखून, नव्यांच्या माथ्यावरून हात फिरविण्याची, मदत करण्याची ऊर्जा चैतन्य देणारी होती आणि ते आले. "काका, काही वर्षांपूर्वी काकूंचे निधन झाले. त्यानंतर केले जाणारे धार्मिक कर्मकांड टाळून तुम्ही मदत पाठवली होती. काकूही शिक्षिका होत्या. दर वर्षी आम्ही तुम्हांला वार्षिक अहवाल पाठवतो. या वयात, मुंबईहून इतक्या दूर... त्यापेक्षा तिथूनच..."
 "अगं ज्या संस्था मी वर्तमानपत्रांतून पाहिल्या, ज्यांच्याशी विचारांचे नाते जोडले. त्या डोळे मिटण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहाव्यात, त्यांना शुभेच्छा द्याव्यात. समविचारी वृद्धांना त्यांची ओळख करून द्यावी, असे मनोमन वाटले. मी ८८ वर्षांचा झालोय. हा माझा पन्नाशीतला पुतण्या. त्यालाही नवी वाट दाखवायला हवी. थांबला तो संपला," काकांनी माझे बोलणे मध्येच तोडून खणखणीत आवाजात पासष्टी ओलांडलेल्या मानसकन्येला बजावले.
 बाबा आमट्यांवर उधळून प्रेम करणारा माझा मित्र काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून सांगत होता, "अगं, बाबांना ब्लड कॅन्सर असल्याचे कळले नि सरळ नागपूर गाठले. तर बाबा निवांत. अरे मी इतक्यात जात नाही. माझी दोन कामं राहिली आहेत. ती पूर्ण व्हायलाच हवीत. मी ४-६ दिवसांनी वरोऱ्याला जाईन तेव्हा तू मला समोर हवास."

रुणझुणत्या पाखरा / १५५