पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पहाटेचे जेमतेम चार वाजलेले असत. पक्षांची किलबिल नुकतीच सुरू झालेली असे. पावलांचे धावते झपझप आवाज घरासमोरच्या रस्त्यावरून उजवीकडून डावीकडे अस्पष्ट होत जात. गाढ झोपेत असलेली मी टक्क जागी होई. "आई, आज नवरात्र सुरू झाले बहुदा. बघ ना एकवीरा मंदिराकडे पहाटेच लोक चाललेत. ऊठ आज आजेपाडवा आहे ना?" आईला गदागदा हलवणारी मी.
 सगळा वाडा गाढ झोपेत असे. मला मात्र शेणाचा सडा घालून रांगोळीने अंगण सजवण्याचे वेध लागत. आमच्या घरात सण उत्सव खाण्यापुरते साग्रसंगीतपणे साजरे होत. पप्पा पक्के समाजवादी होते. आईने त्या काळच्या रितीनुसार पतीच्या हाताला हात लावून 'मम' म्हणण्याची परंपरा कायम ठेवली होती. पण पहिल्या माळेच्या दिवशी ती आजेपाडवा, तिच्या वडिलांची- माझ्या दिवंगत आजोबांची आठवण म्हणून, आवर्जून साजरा करी. ज्येष्ठ सद्गृहस्थांना जेवायला बोलावले जाई. त्यांचा पिता म्हणून सन्मान केला जाई.
 घर आग्रा रस्त्यावर भर बाजारात होते. त्यामुळे अगदी एवढेसेच अंगण हातात येई. गायी दिसल्या की, शेण गोळा करण्यासाठी आम्ही मैत्रिणी धावत असू. अवघे अंगण तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्यांनी आकंठ भरून जाई. ठिपक्यांच्या पारंपारिक रांगोळीबरोबरच, सुंदर पाना-फुलांची रांगोळी, मध्यभागी अदृश्य उभी रेषा कल्पून दोन्ही बाजूंनी अगदी तंतोतंत समान आकृती काढण्याचा प्रयत्न केलेले फ्री हँड...

रुणझुणत्या पाखरा / १५७