पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'आम्ही आहोत महा-तारे,
आम्ही नाही म्हातारे'
'ज्येष्ठांचा सन्मान करा'

 आपल्या ज्येष्ठत्वाचे नारे देत एक समुदाय रस्त्याने जात होता. त्यात निवृत्त अधिकारी, तंत्रज्ञ, विविध विषयांचे प्राध्यापक, अध्यापक, श्रम केल्याशिवाय पोटाला भाकर मिळणे दुरापास्तच असे थकिस्त श्रमिक, निवृत्त व्यावसायिक... असे अनेक होते. महिला होत्या. निवृत्त परिचारिका, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या. पण महिलांच्यात सर्वाधिक संख्या होती एकाकी, वृद्ध, निराधार बंदिनींची.
 ज्येष्ठ नागरिक संघ आणि एका स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी होताना मनात उद्याची आशा होतीच. कारण आयोजनात अनेक तरुण-तरुणी होते. 'आहे रे' या वर्गात समावेश असलेल्यांच्या मनात 'नाही रे'ची झोळी ज्यांच्या हाती आली आहे, अशांसाठी काही रचनात्मक कार्यक्रम राबविण्याची उमेद होती. त्यांनी संकल्प सोडला. हे सारे जसे व्हायला हवे तसे झाले पण तरीही माझ्या मनाला एक वेदना चिरत गेली...
 भारतीय जीवनरितीच्या गाभ्यात ज्येष्ठांचा सन्मान ही भूमिका मूलतःच आहे. महानुभाव पंथाची आद्यकवयित्री महदंबा ज्ञानी होती. तिच्या संदर्भात गोविंद प्रभू म्हणत 'म्हातारी चर्चक: काही तरी पुसतचि असे ।' जी व्यक्ती सतत चर्चा करणारी, एखाद्या

१५४ / रुणझुणत्या पाखरा