पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय मनात रुजलेला आहे. नागाची विजेसारखी नागमोडी, वेगवान चाल त्याचे लखलखीत तेज. त्यानंतर भूमीला सहस्रधारी भिजवणारा पाऊस त्यानंतर फुलणारी हिरवी किमया.
 ज्येष्ठ -आषाढात शेतकरी, शेतकरणी शेतीची मशागत आणि पेरणीच्या धांदलीत गुंतलेले असतात. श्रावणात थोडी उसंत मिळते. अशा वेळी निवांतपणे थकवा दूर करण्याची, मनमोकळे करण्याची हक्काची जागा माहेरच. महाराष्ट्रात नागपंचमी आणि माहेर यांचा अतूट अनुबंध आहे.
 बंधूच्या रूपाने नाग आमच्या भावजीवनात स्थिर झाला आहे. त्याच्या विषयीचे भय वाटतेच. ते दूर करण्याची ही सांस्कृतिक रीत. पेरलेले बियाणे उंदरापासून वाचवणारा तोच, नागपंचमी केवळ भावनिक, सांस्कृतिकच नव्हे तर जातीय सलोख्याचे रूप. ही आहे पंचमी आधी ४-५ दिवसांपासून महिला एकत्र येऊन फेर धरतात, गाणी म्हणतात. त्यातून माहेरची ओढ आणि सासरचा त्रास या बद्दल मनमोकळं करतात.

बारा सणाला नेऊ नकोस
पंचमीला रे ठेवू नको...

मैत्रिणींना साद घालताना त्या म्हणतात,
वाण्या-बामणाच्या लेकी
वारुळाला येता का कुणी?
साळ्या कोष्ट्याच्या मुली
वारूळाला येता का कुणी?
लेकीच्या भेटीला आसुसलेली माया लेकाला विनवते
आली वर्साची पंचमी
जारे सुभाना बाळा
जारे बाळाई बोलावू
लोकाच्या लेकी माहेरात
आमची बाळाई सासरात
सासरी बहीण मनोमनी साद घालते,
पंचमीचा सण नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला,
पाठी भाऊ मागितला...

१५२ / रुणझुणत्या पाखरा