पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नागपूजा अत्यंत प्राचीन आहे. तैत्तिरीय संहितेत, पुराणांत नागाचा उल्लेख आहे. विष्णूचे आसन शेषनाग, तर शिवाच्या गळ्यात नाग. जैन धर्मात नागाचा उल्लेख आहे. बुद्धाच्या जन्मानंतर नंद उपनंद या नागांनी त्याला स्नान घातले असा उल्लेख आहे. सिंधू नदीच्या परिसरात प्रत्येक गावात नागमूर्ती होत्या. बौद्ध काळात ब्राह्मण नागपूजा करीत असत. चिनी प्रवासी ह्युअेनत्संगने नोंदवून ठेवले आहे. सौराष्ट्र, उत्तर प्रदेशात चंबा, कांगडा खोरे, काश्मीर येथे गावागावांतून नागमंदिरे आहेत. तक्षशीलेचे राजे नाग होते. अश्वमेध यज्ञात लोहितावादी आणि बायस या नागांचे पूजन करावे असे सांगितले आहे. हिमालयात शेषनाग, अनंतनाग, संतनाग, इंद्रनाग यांची देवळे प्रसिद्ध असून चिनाब नदीच्या तिरावर वासुकीचे मंदिर आहे. काश्मीरचे राजे कर्कोटकाच्या वंशाचे आहेत असे राजतरंगिणी हा काश्मीरच्या वंशाच्या इतिहासाची प्रत्यक्ष नोंद असलेला ग्रंथ नोंदवितो. केरळमध्ये नायरांच्या घरात काउस नावाचे छोटे सर्प मंदिर असते. नागाला ते कुलदैवत मानतात. बंगालमध्ये नागमंडळ हा नृत्यप्रकार प्रचलित आहे. महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये श्रावणात नागपूजा करतात. पंजाबमधील सफदोन या गावी जनमेजयाने सर्पसत्र केले या समजुतीने विशेष नागपूजा केली जाते.
 नागांचे पाताळात स्वतंत्र जग आहे अशी कल्पना भारतात रूढ आहे. नागकन्या विलक्षण देखण्या असतात. पृथ्वीवरच्या सुंदर, पराक्रमी पुरुषांवर भाळतात. त्यांना नागलोकात नेतात असा कल्पनाबंध अनेक लोककथांतून येतो. अर्जुनाची एक पत्नी उलुपी ही नागकन्या होती. शेष हा नागराज; तो कामवासनेचे प्रतीक मानला जातो. या संदर्भातली एक लोककथा. द्रौपदी ही पाच पतींची पत्नी. तिला आळीपाळीने एकेकाकडे जावे लागे. या गोष्टीचे एक स्त्री म्हणून तिला अत्यंत दुःख असणारच. या वर्मावर दुर्योधन तिला एकटीला गाठून 'आज कुणाची पाळी?' असे विचारून बोट ठेवत असे. हे दुःख ती कोणाजवळ बोलून दाखवणार? एक दिवस तिने आपले मन श्रीकृष्णाजवळ मोकळे केले. श्रीकृष्णाने द्रौपदीस सांगितले. 'आज शेषाची नव्हती' एवढेच उत्तर दे. दुर्योधनाने पुन्हा हा प्रश्न विचारला नाही. दुर्योधनाच्या पत्नीचा उपभोग घेण्यासाठी शेष येई अशी जांभुळख्यानांसारखी कथा लोकवाङ्मयातून मिळते. नाग वा सर्प कामवासनेचे प्रतीक मानले जाते. कटनर या मानववंश शास्त्रज्ञाने सर्प हे सुफलीकरणाचे प्रतीक मानले आहे.
 नागपंचमी हा श्रावणातला सण सुफलीकरणाशी जोडला आहे. नाग हा क्षेत्ररक्षक मानला जातो. वारुळाची माती सर्वांत सुफल, संपूर्णत्वाने भरलेली असते. भूमीच्या सर्जन क्षमतेचे प्रतीक वारूळ तर नाग हे पुरुषत्वाचे... पुरुषत्वाचे प्रतीक हा कल्पनाबंध

रुणझुणत्या पाखरा / १५१