पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सेंट व्हॅलेंटाईनला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला दुःख झाले. मंदिरात येणाऱ्या तरुणांची तो गुपचूपपणे प्रिय व्यक्तींशी भेट घडवून आणी व ईश्वरसाक्षीने विवाह लावी. पण हे गुप्त नाट्य जेव्हा दुष्ट सम्राटाला कळाले, तेव्हा त्याने धर्मोपदेशक व्हॅलेंटाईनला अंधार कोठडीत टाकले. व्हॅलेंटाईनने दृष्ट राजाची क्षमा मागितली नाही. तो मरण पावला तो दिवस १४ फेब्रुवारीचा होता. तेव्हापासून हा दिवस पाश्चात्य देशात साजरा केला जातो. अर्थात ही माहिती वाचलेली वास्तविक प्रेमी ही भावना वैश्विक आहे. रामायण, महाभारत या भारतीय महाकाव्यांत प्रीतीच्या विविध छटा, त्यातील व्यक्तिरेखांमधून व्यास महर्षींनी रंगविल्या आहेत. रुक्मिणी-कृष्ण किंवा सत्यभामा-कृष्ण यांच्या प्रीतीपेक्षा राधा-कृष्णाचे निरामय, सतेज प्रेम हजारो... शेकडो वर्षांपासून भारतीयांना मोहवते. सामान्य माणसापासून ते कलावंतापर्यंत सर्वांना ऊर्जा देते. ते प्रेम अमेय असते आणि पाश्चात्त्यांच्या इ. स. २७०पेक्षा किती तरी आधीपासून ते समाजमान्यता पावलेले आहेत. आम्ही भारतीयांनी ते एका विशिष्ट दिवसात बंद केले नाही. भारतीय प्रेमात सात्त्विकता आहे. ते केवळ शरीरसुखात अडकलेले नाही. त्यात मानसिक उत्कटता आहे. प्रीतीचा वैश्विक आदिबंध 'राधे'च्या प्रेमातून वा 'मिरे'च्या प्रेमातून व्यक्त होतो.
 मला नेहमीच असे वाटते की, संपूर्ण समर्पणात्मक निरामय प्रीती स्त्रीच करू शकते. क्वचित पुरुषही! अर्जुन, त्याला दिलेल्या शिक्षेच्या काळात ईशान्येकडील सप्त भगिनींपैकी मणिपूर राज्यात गेला. त्या भागात तेव्हाही स्त्रिया स्वतंत्रपणे निर्णय घेत. तेथील राजकन्या चित्रांगदा अर्जुनाच्या प्रेमात पडली. सहवासातून बब्रुवाहनाचा जन्म झाला. शिक्षा पूर्ण झाल्यावर अर्जुन परत गेला. मात्र युद्धाच्या वेळी तिने बब्रुवाहनाला अर्जुनाकडे पाठविले. परंतु ती मणिपुरताच राहिली. दमयंती अत्यंत देखणी होती. ती नलराजात मनाने गुंतली होती. तिच्या विवाहप्रसंगी सगळे देव नलाचे रूप घेऊन तेथे आले. पण तिने अचूकपणे नलराजाच्या गळ्यात वरमाळा टाकली. पुरुष अधिक करुन शारीरिक प्रेमात अडकतात; त्यामुळे तृप्ती झाली की ते मोकळे होतात. तिथे समर्पण नसते. दमयंतीने प्रेमाचा संदेश हंसाबरोबर पाठविला. इंद्राच्या शापाने दग्धावस्थेत तळमळणाऱ्या यक्षाने, प्रेमाचा संदेश रामगिरी पर्वतावरून उत्तरेकडे जाणाऱ्या मेघासोबत पाठविला. शकुंतलेने दृष्यांत राजावर प्राण- शरीर ओवाळून टाकले भरताला जन्म देण्यात धन्यता मानली.
 कवी अनिलांनी ही म्हटले आहे...

वाटेवर काटे वेचित चाललो,
चाललो जसे फुलाफुलांत चाललो किंवा
...जवळ तसे काहीच नव्हते फक्त हाती हात होते.

१४८ / रुणझुणत्या पाखरा