पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दैनिकात बातमी छापून आली होती. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी एकत्र फिरणाऱ्या तरुण-तरुणींना अडवून एका संघटनेने त्यांना चक्क उठ - बशा काढायला लावल्या होत्या. सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा 'प्रेमळ' दिवस पाश्चात्त्य देशात साजरा केला जातो. आपल्या आवडत्या 'प्रिय'ला आपल्या मनोभावना कवितेतून वा पत्रातून या दिवशी कळविल्या जातात. तो 'खास', याने की 'स्पेशल' दिवस संघटनांनी केलेला विरोध पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासाठी होता की, ज्या अतिरेकी व आचरटपणाने प्रेम व्यक्त करण्याच्या आचाराला वा कृतीला होता? की आपण किती 'देशप्रेमी' आहोत हे समाजाला दाखविण्यासाठी होता.
 इसवी सन २७०चा काळ; म्हणजे सुमारे १ हजार ७३७ वर्षापूर्वीचा काळ रोमवर तेव्हा क्लॉडियस नावाचा दुष्ट राजा राज्य करीत होता. त्याला 'क्लॉडियस द क्रुअेल' असे म्हणत असत. त्याच्या राजवाड्याजवळ अतिशय सुंदर मंदिर होते. त्यात व्हॅलेंटाईन नावाचा अत्यंत मायाळू धर्मोपदेशक राही. रोमची जनता त्याच्यावर खूप प्रेम करी. राजा क्लॉडियस रोम मधील तरुणांना सातत्याने होणाऱ्या यादवी युद्धावर पाठवी. आपल्या लाडक्या जीवनसाथीला सोडून जाणे तरुणांना अगदी नकोसे वाटे. पण राजाज्ञा पाळावीच लागे. जेव्हा लढणारे सैनिकच कमी राहिले; तेव्हा राजाने फर्मान काढले की कोणीही विवाह करायचा नाही आणि ज्यांचे साखरपुडे पार पडले आहे ती लग्ने मोडून टाका. त्यामुळे अनेक प्रेमी स्त्रियांनी मृत्यू स्वीकारला. अनेक तरुण दुःखी झाले.

रुणझुणत्या पाखरा / १४७