पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाव उलटली तरी वाचवतात. अन् घाबरायचं कशाला? मी तुला रामरक्षा शिकवते. भीती वाटली की म्हणत जा. तुझी आई नि पप्पा तुला काय शिकवणार रामरक्षा ? संध्याकाळी शुभंकरोती म्हणशील तेव्हा माझ्या जवळ ये.' आणि मी रामरक्षा शिकले. आत्याबाईचे ५०० एकराचे आंब्याचे वाडीचे शेत गुजरातेत होते. कडेनी वाहणारी खाडी. प्रत्येक आंब्याला काका; आत्याबाई पासून ते लेकरंबाळं, मामा, मामी सगळ्यांची नावे देत. उन्हाळ्यात घरी आंबे आले की सांगत 'शैला हा तुझ्या बापाच्या नावाचा' 'मामावाळा हापूस'. खा.' त्या शेतात पुढे टीव्हीवरच्या रामायणाचे शुटींगही झाले. तेंव्हा घर महाराष्ट्रात होते आणि शेत गुजरातेत. गेल्या ५५/५८ वर्षांत उंबरगाव बदललेय. व्यापारी शहर झालेय. ...पण नीरव, सुशांत समुद्रकिनारा, रसदार चिक्कू, तांदळाची भाकरी, मेतकूट भाताची लहानांची पंगत आणि रामरक्षा यांनी नटलेलं उंबरगाव माझ्या मनात गोठून गोंदले गेलेय.
 त्यानंतर गेल्या चाळीस बेचाळीस वर्षांत मी अनेक सागर, महासागर अनुभवले. किंबहुना प्रत्येक सागराचे वेगळेपण न्याहाळण्याचा छंद लागला. ओरिसात अखिलभारतीय पातळीवरची स्त्री - अभ्यास परिषद होती. भुवनेश्वरला. नोव्हेंबरचे दिवस. परिषद संपताच कोणार्कचे सूर्य मंदिर, पहाटे साडेपाचलाच पूर्वेला पसरणारी उगवत्या सूर्याची लालीमा, चांदीपूरचा चांदण्यात चमचमणारा किनारा, यांचे दर्शन घ्यायचे होते. आणि मग अनायसे आलोच आहोत तर जगन्नाथपुरीचे मंदिरही पहायचे.
 ... पहाटे साडेचार वाजता चक्क थंड पाण्यानी आंघोळ. अंगावरची शाल घट्ट लपेटून आम्ही मैत्रिणी समुद्रकिनारा गाठायला धावत होतो. घड्याळाचा काटा पाचच्या पुढे सरकणारा. पाण्यात पाय बुडवून पूर्वेच्या दिशेने स्थिरावलेले. डोळे. चंदेरी प्रकाश. लक्षात आले की काही ढग क्षितीजाला टेकून मस्त लोळताहेत. समुद्रात नाहून उगवणाऱ्या कोमल अरुणाचे दर्शन नशिबात नसावे असे वाटून मनात ढग दाटले. इतक्यात आव्या... आयगो... आछेन... आछी... उगवला अशा शब्दांचे तुकडे आणि टाळ्या. जेमतेम पाच सहा सेकंदाचा काळ. सूर्य पहाता पहाता क्षितीजावर येऊन

उभा राहिला.
 ... हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवाचा ईश्वर चार भिंतीत, डब्याच्या चौकटीत बांधलेला नव्हताच! उगवत्या पहाटेचा स्पर्श अंगांगावरुन फिरवणारा तो सूर्योदय मी मनात जपून ठेवलाय. ...महाबलीपुरमच्या महाकाय खडकाळ किनाऱ्यावरची पुनवेची चांदणी रात्र. भरतीच्या उन्मत्त लाटांचा धिंगाणा नुकताच वीस बावीस वर्षांनंतर अजूनही शांतावला नाही.

रुणझुणत्या पाखरा / १४५