पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याचे पहिल्यांदा पाहिलेले रूप. नितान्त नीरव. निळसर राखाडी रंगाची किनार, उत्तर दक्षिणेकडे नजर पोचेपर्यंत पसरलेली. पश्चिमेलाही नजर हरवून जाईपर्यंत गडद होत जाणारा राखाडी रंग. आणि पूर्वेकडे झाडांत लपलेली कौलारू घरे. भोवताली हिरव्या झाडांची, नारळी पोफळी, चिकू, जामून यांची दाटी. तेव्हा मी असेन सहा सात वर्षांची. तेव्हापासून त्याचे रूप मनात ठसले. त्याची तऱ्हेतऱ्हेची रुपे न्याहाळण्याचा छंद लागला.
 उंबरगावला माझ्या आत्याचे दुमजली कौलारू घर होते. समोर भले मोठे अंगण. त्यात दोन बाजूला चिकूचे चक्क वृक्ष. पायऱ्या चढून गेले की लांबलचक व्हरांडा. मग बैठक. भला मोठा पितळी कड्यांचा झोपाळा. घरातल्या कर्त्या पुरुषाची... काकांची खास बैठक. मधल्या खोलीतही झोपाळा. थोडा लहान. त्यावर घरातल्या स्त्रिया हुश्श करून विश्रांती घ्यायला बसणार. संध्याकाळी त्यावर राज्य असायचे लेकीबाळी, मुलांचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आले की मला वेध लागत उंबरगावचे. मी नि पप्पा उंबरगावला जात असू. सकाळ संध्याकाळ समुद्रावर फिरायचे. भरती ओहोटीची आंदोलने डोळाभर पहायची. सुरूच्या घनदाट झाडीच्या मध्यातून मऊसूत वाळूतून, हातात चपला घेऊन पळायचे. एखादे दिवशी नावेतून खाडी ओलांडून नारगोळला जायचे. अर्थात बोट पलीकडच्या किनाऱ्याला लागे पर्यंत तोंडात राम... राम. देवाचे नाव. एक दिवस घाबरलेल्या मला आत्या म्हणाली 'अग नावाडी वाकबगार असतात.

१४४ / रुणझुणत्या पाखरा