पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'हये बगा, आया बहिणींना आधी खाऊ द्या. मायबहिणींनो उस्ट टाकू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. पलिकडे एक टोपलं ठेवलंय. त्यात कागदाचा बोळा टाका. हितं तिथं टाकू नका. गाव वाल्यांनी आपल्या दिंडीला नाश्ता दिलाय. आपल्या भागातल्या पंचायत समितीत निवडून आलेल्या शमावैनी चार दिवस आपल्या बरोबर दिंडीत चालनार आहेत. त्या गावाच्या वतीने तुमचे आभार मानतील, आन् मग दिंडी पुढे सरकेल. पान्याची टिपं ठेवलीत. न सांडता आपआपल्या तांब्यात पाणी घ्या. चला...'
 मी ते पाहिले आणि २१व्या शतकातल्या काळा सोबत चालणाऱ्या दिंडीचे दर्शन घेतले. न कळत त्या दिंडीला हात जोडले.
 या दिंड्या, वारकरी संप्रदाय, त्यातील विचार म्हणजे चालत्या बोलत्या, बिनभिंतीच्या पाठशाळा आहेत. सावळा विठ्ठल, त्याच्या भोवती सतत भिरभिरणारी समता विचाराची, सांस्कृतिक एकात्मतेची वलये. काल होती. आज आहेत आणि उद्याही राहतील, विठूराया ही सामान्य माणसाची 'स्वप्नभूमी' आहे. तिने चोखामेळा, जनाबाई, सावतामाळी, संन्यास त्यागून संसार करणाऱ्या विठ्ठलपंतांच्या... समाजाने टाकलेल्या त्यांच्या चार मुलांना, तुकोबाला... अनेकांना समर्थपणे निरभ्र जीवन जगण्याचे बळ दिले. एकनाथांसारखा ब्राह्मण कुळात जन्मून 'संस्कृत देवें केली प्राकृत काय चोरापासौनि आली?' असा खडा सवाल ब्राह्मण पंडितांना विचारणारा व 'भागवत' मराठीतून लिहिणारा लोककवी महाराष्ट्राला दिला.
 ...हे विठूराया तुला सर्वांचे, आमच्यासारख्या नास्तिकांचे दंडवत.

१३६ / रुणझुणत्या पाखरा